सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या फोंडा, गोवा येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती वालावलकर (वय ८५ वर्षे) !
१०.२.२०२४ या दिवशी फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. २१.२.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या निधनापूर्वी नातेवाईकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. सीमा महादेव सामंत (श्रीमती दमयंती वालावलकर यांची धाकटी मुलगी), फोंडा, गोवा.
१ अ. सध्या माझी आई (श्रीमती दमयंती वालावलकर) मुळीच बोलत नाही. तिला सर्व नातेवाईक भेटून गेले. तेव्हा ती सर्वांना डोळ्यांनी प्रतिसाद देत होती.
१ आ. साधक भेटायला आल्यावर जाणवलेली सूत्रे
१. आईला साधक श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देत होते. तेव्हा तिच्या चेहर्यावर वेगळाच आनंद जाणवत होता. तिच्या चेहर्यावर पुष्कळ प्रकाश आणि तेज जाणवत होते.
२. आई सर्वांना डोळ्यांनी प्रतिसाद देत होती. तेव्हा तिच्यामध्ये बालकभाव जाणवला.
३. श्री. अरुण कुलकर्णी यांनी आईविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेला लेख दाखवला. तेव्हा तिच्या चेहर्यावर हास्य होते. ‘तिने गुरुदेवांना हसून नमस्कार केला’, असे मला जाणवले.
४. ती ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात असते आणि ती देहबुद्धीच्या पलीकडे गेली आहे’, असे मला जाणवले.
१ इ. ती खाण्यासाठी काहीच मागत नाही; मात्र तिला दिलेले ती शांतपणे ग्रहण करते.
१ ई. तिच्या सहवासात माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होतो.’
२. श्री. अमेय विजय लोटलीकर (आजींच्या मुलीचा पुतण्या), फोंडा.
२ अ. आसक्ती नसणे : ‘आम्ही श्रीमती वालावलकरआजींना फार वर्षांपासून ओळखतो. त्यांची वृत्ती समाधानी आहे. त्यांची आसक्ती अत्यल्प असून त्यांनी त्यांचा मुलगा किंवा जावई यांच्याकडे कधीच काही मागितले नाही.
२ आ. सतत नामजप करणे आणि चेहर्यावर तेज जाणवणे : सप्टेंबर २०२३ मध्ये गणेशोत्सवाच्या वेळी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज जाणवले. त्यांचा नामजप सतत चालू होता आणि त्यांच्या त्वचेवर चकाकी जाणवत होती.’
३. सौ. आर्या अमेय लोटलीकर (आजींच्या मुलीच्या पुतण्याची पत्नी), फोंडा, गोवा.
३ अ. प्रगतीची पूर्वसूचना मिळणे : ‘आम्ही कणकवलीहून आजींना भेटून निघाल्यावर प्रवासात असतांना सौ. संगीता लोटलीकर (माझ्या सासूबाई) म्हणाल्या, ‘‘आजींची साधना आधीपासूनच चालू आहे; पण आता त्यांची लवकरच प्रगती होईल’, असे वाटते.’’ गुरुदेवांनी आम्हाला आजींच्या प्रगतीची पूर्वसूचना दिली होती.
३ आ. शांत स्वभाव : श्रीमती वालावलकरआजी आधीपासूनच शांत स्वभावाच्या आहेत. आमचे त्यांच्याकडे जाणे-येणे होते. आजपर्यंत एकदाही मी त्यांना रागावलेले किंवा चिडलेले बघितले नाही. त्या नेहमी इतक्या शांत असतात की, त्या घरात आहेत कि नाहीत, हेसुद्धा आम्हाला कळायचे नाही.
३ इ. सतत अनुसंधानात असणे : त्यांची आंतरिक साधना सतत चालूच असायची. ‘त्या सर्वांच्या समवेत असूनही त्या ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे मला वाटायचे.
३ ई. गुरूंप्रती भाव : आम्ही सप्टेंबर २०२३ च्या गणेशोत्सवासाठी गावी गेलो असता कणकवलीला त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना भेटल्यावर ‘त्या ईश्वराशी एकरूप झाल्या आहेत आणि त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची पुष्कळ ओढ लागली आहे’, असे मला वाटले. मी त्यांना विचारले, ‘‘आजी, कशा आहात ?’’ तेव्हा त्यांनी गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून म्हटले, ‘‘गुरुदेवांनी ठेवले, तशी आहे.’’ तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. त्यांना सतत गुरुदेवांची आठवण येत होती. एखादे लहान बाळ जसे आईला हाक मारून रडते, तशा त्या गुरुदेवांना हाका मारत होत्या. तेव्हा नेहाकाकूंनी (आजींच्या मुलीने) त्यांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप करायला सांगितला आहे.’’ तेव्हा त्या भावपूर्ण नामजप करू लागल्या. त्यांचे भावाश्रू थांबत नव्हते. ‘त्या सतत भावावस्थेत होत्या’, असे आम्हाला वाटले.’
४. सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे) (आजींच्या मधल्या मुलीच्या, सौ. नेहाच्या जाऊ), फोंडा, गोवा.
४ अ. अखंड नामस्मरण करणे : श्रीमती आजी आमच्या घरी आल्यावर अखंड नामस्मरण करायच्या. तसेच त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करून त्यांच्या अनुसंधानात असायच्या.
४ आ. अपेक्षाविरहित आणि कष्टमय जीवन जगणे : आजींनी पूर्वी पुष्कळ कष्ट केले आहेत. त्यांचे एकत्र कुटुंब होते. त्यामुळे आजींना घरातील कामे आणि सर्वांचा स्वयंपाक करावा लागत होता. आजींच्या नणंदेची मुलेही त्यांच्याकडेच रहात होती. त्यांनी सर्वांना आपल्या मुलांप्रमाणेच प्रेम दिले. त्यांना २ मुली आणि १ मुलगा होता. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती, तरी त्यांनी कधी गार्हाणे केले नाही किंवा कसली अपेक्षाही ठेवली नाही.
४ इ. सेवेत साहाय्य करणे : आजी त्यांच्या मुलीकडे रहायच्या, त्या वेळी त्या मुलींना ‘तुम्ही सेवेला जा’, असे सांगत आणि जमतील तशी घरातील कामे करत असत.
४ ई. बालकभाव : सध्या आजी रुग्णाईत आहेत. या स्थितीत मी त्यांना विचारले, ‘‘आजी, प.पू. डॉक्टर कुठे आहेत ?’’ तेव्हा त्या लहान मुलासारखे बोट दाखवतात. आता त्या लहान मुलासारख्याच दिसतात.
४ उ. त्यांच्या चेहर्यावरील तेज वाढले असून त्यांची कांती मऊ लागते.
४ ऊ. गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : आम्ही आजींना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना उठून बसवायला गेल्यावर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्या उठून बसल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर पहात आहेत, तिकडे पहा.’’ तेव्हा त्या लगेच त्या दिशेने पाहू लागल्या. ‘त्या प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या सहवासात माझा ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप चालू झाला.’
५. श्री. विजय लोटलीकर (६१ टक्के आध्यात्मिक पातळी, वय ७१ वर्षे) (आजींच्या सौ. नेहा या मुलीचे मोठे दीर), फोंडा, गोवा.
५ अ. नम्रता : ‘श्रीमती वालावलकरआजी वयाने मोठ्या असूनही त्या मला नावाने कधीच हाक मारत नाहीत. मला सर्व जण दादा किंवा काका म्हणतात. त्याही मला ‘दादा’ म्हणून हाक मारायच्या.
५ आ. नामजप करणे : त्यांना साधना कळल्यापासून त्या माळ घेऊन नामजप करू लागल्या.
५ इ. निर्विचार स्थितीत असणे : त्या त्यांच्या मुलीकडे रहात होत्या, तरीही त्यांना कधीही ‘मुलापासून दूर रहात आहे’, असे वाटले नाही; कारण त्या पुष्कळ वेळ निर्विचार स्थितीत असत.
५ ई. घरकामात साहाय्य करणे आणि स्वावलंबी असणे : त्या मुलीला सर्वतोपरी साहाय्य करत असत. त्या सर्वकाही आनंदाने आणि शांतपणाने करत असत. त्या स्वावलंबी आहेत. आजारपणापूर्वी त्या स्वतःचे कपडे स्वतःच धुत असत.
५ उ. कर्तेपणा नसणे : पूर्वी त्यांचा संसार मोठा होता. तेव्हा त्यांनी सर्वांची चांगली सेवा करून सर्वांना मोठे केले; पण त्यांनी हे कर्तेपणाचे विचार कधीच बोलून दाखवले नाहीत. त्यांनी त्यांच्याकडे रहात असलेल्या मुलींची लग्ने लावून दिली; पण ‘मी काही केले’, असे त्या कधी म्हणाल्या नाहीत.
५ ऊ. गुरूंप्रती भाव : आठ दिवसांपूर्वी मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना मुलींनी सांगितले, ‘‘आई, कोण आले आहेत बघ. परम पूज्य आहेत ना ?’’ तेव्हा त्यांनी डोळे उघडून पाहिले आणि मानेनेच ‘होकार’ दर्शवला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आजींच्या हृदयात स्थित आहेत आणि त्यांची आठवण आजींना शेवटच्या श्वासापर्यंत येत राहील’, हे आमच्या लक्षात आले.’
(सर्व सूत्रांचा दिनाक १३.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |