बुलढाणा येथे महाप्रसादातून ५०० हून अधिक जणांना विषबाधा !

अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत आधुनिक वैद्य अनुपस्थित; गावकर्‍यांमधून संताप व्यक्त !

बुलढाणा – जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात २० फेब्रुवारी या दिवशी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली; मात्र जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी अन् जुलाब यांचा त्रास चालू झाला. अंदाजे ४५० ते ५०० जणांना या जेवणातून विषबाधा झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांत उपचार चालू आहेत.

अन्नातून होणारी विषबाधा दूर करण्यासाठी करावयाचा नामजप !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अन्नातून विषबाधा होत असल्याच्या बातम्या वाचनात येत आहेत. अशा प्रकारे होणारी विषबाधा रोखण्यासाठी वैद्यकीय उपचार करण्यासमवेत पुढील नामजप करावा.

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री दुर्गादैव्ये नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’

या नामजपांचा मिळून १ नामजप होतो. असा हा नामजप विषबाधा झालेल्यांनी प्रतिदिन १ घंटा करावा. हा नामजप विषबाधेचा त्रास पूर्णपणे दूर होईपर्यंत प्रतिदिन करावा.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (२१.२.२०२४)

यातील १०० ते १२० जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर अद्यापही ४०० जणांवर उपचार चालू आहेत. यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयातील जागा आणि आधुनिक वैद्य अपुरे पडत असल्याने बुलढाणा येथून आधुनिक वैद्यांचे पथक बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात पलंग उपलब्ध नसल्याने अनेकांना खालीच झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक वैद्य अनुपस्थित असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली होती. या कारणास्तव गावकर्‍यांमध्ये संताप पहायला मिळाला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. (यातील दोषींना नुसते निलंबित नको, तर बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे. – संपादक)  

यवतमाळ – येथेही अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी एका गावात २०० भाविक आजारी पडले.