उद्या पेढांबे (ता. चिपळूण) येथे ग्रामदेवता श्री सुकाईदेवी मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा
चिपळूण (रत्नागिरी) : माघ शुक्ल द्वादशी (२१ फेब्रुवारी) ते माघ शुक्ल त्रयोदशी (२२ फेब्रुवारी २०२४) या कालावधीत श्री सुकाईदेवी मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा धार्मिक विधीपूर्वक साजरा होत आहे. या निमित्ताने २१ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता जुन्या मूर्तींचे पाणी उतरणे, होम हवन, वास्तूशांती आदी विधी, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि रात्री १० वाजता भजन होणार आहे.
२२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता देवतांचे अर्चन, बळीपूजन, १० वाजता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन, श्री गणेशमूर्ती पूजन, १०.१५ वाजता नवीन मूर्तींची स्थापना, होम हवन, ११ वाजता मंदिर उद्घाटन सोहळा, दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण विधी आळंदी येथील ह.भ.प. भागवत महाराज भारती यांच्या हस्ते होणार आहे. १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत ह.भ.प. भारती महाराज यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता महाप्रसाद, रात्री ११ वाजता नमन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराचे उद्घाटन श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री शशिकांतराव गणपतराव शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार सुनीलभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा होणार आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार भास्करराव जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार रमेशराव कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, श्री सुकाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र मधुकरराव शिंदे, श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रतापराव शिंदे, उद्योजक मोहनराव कदम आणि ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित रहाणार आहेत. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साही आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुकाई देवी देवस्थान ट्रस्ट मौजे पेढांबे आणि श्री सुकाईदेवी जीर्णोद्धार निधी समिती, मुंबई आणि सर्व ग्रामस्थ यांनी केले आहे.