गोवा : अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भेट

पणजी, २० फेब्रुवारी (पत्रक) : गोव्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी लागू करणे,  शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानसचा समावेश करणे, प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली येथील उद्ध्वस्त श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची पुनर्उभारणी करणे आणि  गोवा राज्याला पुनश्च प्राचीन कालापासून असलेली आध्यात्मिक ओळख प्राप्त करून देणे, अशा ४ गोष्टींचा आग्रह अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केला. २० फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो, पणजी येथील बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली.

या भेटीच्या वेळी त्यांच्या समवेत आझमगड येथील श्री श्री १००० वराह पीठाधीश्वर श्याम नारायण दास महाराज, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील, भारतमाता की जय संघाचे गोवा राज्य संघचालक गोविंद देव, राज्य सहसंघचालक प्रा. प्रवीण नेसवणकर, सांखळी तालुका संघचालक दामोदर नाईक, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा राज्य अध्यक्ष नितीन फळदेसाई आणि सहकार्यवाह श्री. गणेश गावडे उपस्थित होते.

भेटीच्या प्रारंभीच जगद्गुरु परमहंस आचार्य महाराजांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा प्रसादशाल घालून सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनीही जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज आणि श्याम नारायण दास महाराज यांना शाल, श्रीफळ अन् पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी मुख्यमंत्र्यांना ‘राष्ट्र देवो भव; राष्ट्र सर्वोपरी’, हा संदेश दिला.

गोवा राज्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख आणि दिशा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले अन् केलेली कार्यवाही यांचा आलेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदित केला. या वेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनेही एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येऊन भेटीची सांगता झाली.