शिवजयंतीनिमित्त सातारावासियांनी अनुभवला शिवकाळ !
सातारा, २० फेब्रुवारी (वार्ता.) – ऐतिहासिक सातारा नगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवतीर्थावर श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला ५ नद्यांच्या पवित्र पाण्याने अभिषेक घालण्यात आला. या वेळी सहस्रो सातारावासियांनी साक्षात् शिवकाळ अनुभवला !
ब्रह्मवृदांच्या मंत्रपठणाने छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. नंतर शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी १०० फूटी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने शिवतीर्थ परिसर दणाणून गेला होता.
शिवजयंतीनिमित्त श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राजवाडा येथील गांधी मैदानापासून शोभायात्रा काढण्यात आली. घोडे, उंट, हत्ती, केरळीय वाद्यपथक, ढोल-ताशा, मर्दानी खेळांचे पथक यांच्या सहभागामुळे ही शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.