…आणि ते ‘ब्रह्मचैतन्य’ गोंदवलेकर महाराज झाले !

आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती आणि पंढरीची वारी असून त्यांचे पूर्वज सदाचारसंपन्न अन् लौकिकवान होते. स्मरणशक्ती, चलाख बुद्धी, निर्भय वृत्ती, रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या. ते ९ वर्षांचे असतांना गुरूंच्या शोधार्थ घर सोडून गेले; पण त्यांच्या वडिलांनी पुन्हा त्यांना घरी परत आणले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न करण्यात आले; परंतु त्यांचे प्रपंचामध्ये चित्त रमेना आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. शेवटी समर्थ रामदासस्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण हे त्यांना भेटले. श्रीरामकृष्ण यांनी त्यांना श्री तुकारामचैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.

या सल्ल्यानुसार ते श्री तुकारामचैतन्य यांच्याकडे गेले. तेथे ९ मास राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देहबुद्धीविरहित आणि पूर्ण ज्ञानी झाले. श्री तुकारामचैतन्य यांनी त्यांचे नाव ‘ब्रह्मचैतन्य’ असे ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तीमार्गाला लावण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सहस्रो लोकांना रामभक्तीला लावले.