लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) !

२०.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. (सौ.) सुनीता खेमका यांचे बालपण, त्यांच्यातील दैवी गुण आणि सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागण्याआधीही त्यांनी अनुभवलेली देवाची अपार कृपा पाहिली. आता या भागात सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर मनात कुठलाही विकल्प न येता त्यांनी सर्वच सेवा कशा परिपूर्ण केल्या, त्यांची गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट आणि त्यांनी तेव्हा अनुभवलेले भावक्षण, गुरुदेवांवर असलेली दृढ श्रद्धा आणि साधना करतांना आलेल्या अनुभूती हा भाग पहाणार आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/766471.html

पू. (सौ.) सुनीता खेमका

८. सनातन संस्थेशी झालेला संपर्क

८ अ. सनातनचे साधक श्री. संजीव कुमार (आताचे पू. संजीव कुमार) यांनी नामजप करण्यास सांगणे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे, त्यानंतर श्री. अरविंद ठक्कर यांनी सत्संग घेऊन त्यात नामजपाचे महत्त्व सांगितल्यानंतर नामजप आपोआप चालू होणे : ‘श्री. संजीवकुमार (आताचे सनातनचे ११५ वे (समष्टी) संत पू. संजीव कुमार (वय ७३ वर्षे)) हे यजमानांचे मित्र आहेत. संजीवदादा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. त्यांनी आम्हालाही ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला सांगितले होते; पण ‘आम्ही पूजा-पाठ, व्रते इत्यादी सर्व करतच आहोत; मग नामजपाने वेगळे काय होणार ?’, असे आम्हाला वाटत होते. संजीवदादांचा दूरभाष येत असे, तेव्हा यजमान घरात नसतील, तर मी तो दूरभाष उचलत असे. तेव्हा ते मलाही नामजपाविषयी विचारत असत; पण मी तो विषय टाळत असे. वर्ष २००० मध्ये धनबादमध्ये श्री. अरविंददादांचा (सनातनचे साधक श्री. अरविंद ठक्कर यांचा) सत्संग होता. आम्ही दोघे पहिल्यांदाच सत्संगाला गेलो होतो. संजीवदादांनी आम्हाला ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला सांगितले होते; मात्र या सत्संगानंतर आमच्याकडून ‘हे नामजप केव्हा आणि कसे चालू झाले ?’, हे आम्हालाही कळले नाही.

८ आ. नामजपाला आरंभ केल्यानंतर आलेल्या अनुभूती !

८ आ १. कुटुंबातील सर्व जण जयपूर येथे स्थलांतरित झाल्यामुळे घरात एकटेपणा जाणवून रडू येणे; मात्र नामजप करू लागल्यावर एकटेपणाची भावना उणावणे : याच कालावधीत आमच्या कुटुंबातील सर्व जण जयपूर येथे स्थलांतरित झाले होते; मात्र आम्ही (यजमान, मी आणि मुले) येथेच राहिलो होतो. त्यामुळे मला नेहमी एकटेपणा जाणवत होता आणि ‘मी एकटीच आहे’, असे वाटून मला रडू येत असे. नामजप करायला आरंभ केल्यानंतर हळूहळू मला वाटणारा एकटेपणा न्यून होत गेला. तेव्हा ‘नामजप केल्यामुळेच मला जाणवणारा एकटेपणा न्यून झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझी नामजपावरील श्रद्धा वाढली.’

८ आ २. ‘कर्ता-करविता भगवंतच आहे’, याची झालेली जाणीव ! : कुटुंबातील सदस्य जयपूरला गेल्यावर मला एकटेपणा वाटत असल्यामुळे यजमान मला म्हणाले, ‘‘तूही तिकडे जा. मी एकटा येथे रहातो.’’ तेव्हा माझ्या मनात आले, ‘तुम्ही येथे रहाणार आणि मी तिथे’, असे कधीच होऊ शकत नाही. असे मी माझ्या जीवनात कधीच करू शकत नाही.’ त्यानंतर काही प्रसंग असे घडले की, मला माझ्या मुलांसह जयपूरला जावे लागले आणि मी २ वर्षे तिथेच राहिले. ‘मी हे कधीच करू शकणार नाही’, असे मला वाटे, नेमके तेच मला करावे लागले. असे माझ्या जीवनात आणखीही २ – ३ प्रसंग आले. आता त्याचे स्मरण झाल्यावर मला वाटते, ‘मी असे करूच शकत नाही’, असे मी म्हणत होते. तेव्हा भगवंत माझ्याकडे पाहून हसत असेल. त्या प्रसंगांतून मला जाणीव झाली, ‘खरेतर आपल्या हातात काहीच नसते. कर्ता-करविता भगवंतच आहे.’

९. साधनेत आल्यावर केलेल्या विविध सेवा !

९ अ. गुरुकृपेमुळे कुठल्याही सेवेविषयी मनात विकल्प न येता ती चांगली करण्याचा प्रयत्न करणे : सेवेविषयी माझ्या मनात नेहमी आज्ञापालन करण्याचा विचार असतो. मला जी सेवा मिळाली आहे, ती मनापासून करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न होत असे. वर्ष २००१ मधील माझ्या पहिल्याच गुरुपौर्णिमेच्या वेळी मला मिळालेली सर्वांत पहिली सेवा ही ‘चप्पल व्यवस्था’ करण्याची सेवा होती; पण माझ्यावर एवढी गुरुकृपा होती की, ‘ही सेवा मी कशी करू ? मला गुरुपौर्णिमेला आलेल्या लोकांच्या चपला उचलून मांडणीत नीट ठेवायला लागतील’, असा अहंचा विचार एकदाही माझ्या मनात आला नाही; उलट ‘मी ही सेवा चांगल्या प्रकारे कशी करू ?’ हाच एकमेव विचार मनात होता.

९ आ. मिळालेली प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि तत्परतेने करणे : कधीही कुणीही सेवा सांगितली, तरी मी ती सेवा त्वरित करण्याचा प्रयत्न करत असे. मला कुठलीही सेवा अगदी मनापासून स्वीकारता येत होती. मग ती शिबिराच्या वेळी स्वयंपाकघरात मिळालेली सेवा असो किंवा सभेसाठी व्यासपीठ सिद्धतेची सेवा असो किंवा ग्रंथ मोजणीची सेवा असो. कुठलीही सेवा मिळाली, तरी ती परिपूर्ण आणि तत्परतेने करण्याचा मी प्रयत्न करीत असे.

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मिळालेला सत्संग !

१० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रथमच पहातांना जाणीव हरपणे आणि केवळ ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटून पुष्कळ आनंद होणे : वर्ष २००५ मध्ये देवद येथील पनवेल आश्रमात आमची (मी, यजमान आणि मुलगी मेघा यांची) प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रथम सत्संग लाभला. गुरुदेवांना पहातांना मला एकदम वेगळे वाटले. मी माझी राहिलेच नाही. ‘केवळ त्यांना पहातच रहावे’, असे मला वाटत होते. माझ्या मनाला फार आनंद जाणवत होता.

११. गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे !

११ अ. ‘रामनाथी आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे, ही ईश्वराचीच कृपा होती’, असे वाटणे : आमच्या विवाहाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुटुंबीय रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथे आम्ही ३ – ४ दिवस आश्रमात होतो, तेथे मला परम पूज्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. तेव्हा ‘त्यांचे दर्शन होणे, ही केवळ ईश्वराची कृपाच होती’, असे मला वाटले.

११ आ. विवाहाच्या वाढदिवसानिमित्त काढलेली छायाचित्रे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ही छायाचित्रे पुढे सहस्रो वर्षे रहातील’, असे म्हणणे : विवाहाच्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भेटवस्तू दिली आणि आमची छायाचित्रे काढायला सांगितली. आमची छायाचित्रे पाहून गुरुदेव म्हणाले, ‘ही छायाचित्रे सहस्रो वर्षांपर्यंत चालतील.’ तेव्हा त्यांच्या त्या बोलण्याचा भावार्थ आम्हाला समजला नव्हता. नंतर ग्रंथ, फ्लेक्स इत्यादींवर आमच्या दोघांची छायाचित्रे पाहिली, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ माझ्या लक्षात आला.

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढवणारे प्रसंग !

१२ अ. बाहेरच्या वातावरणामुळे मुलांना अयोग्य सवयी लागल्या, तर त्यांना त्यापासून परावृत्त करण्याएवढी क्षमता सौ. खेमका यांच्यात नसणे आणि ‘केवळ गुरुकृपेमुळेच मुले योग्य मार्गावर आहेत’, याची जाणीव होणे : ‘प्रत्येकच मुलाचे माता-पिता आपल्या मुलांना योग्य शिक्षण आणि चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतात; परंतु तरीही कधी कधी मुले भरकटतात आणि व्यसनाधीन होऊन वाईट मार्गाला लागतात. मुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवण्याएवढी माझी क्षमता निश्चितच नाही; मात्र ‘आमच्यापाशी सर्वकाही असूनही आमची मुले वाईट संगतीला लागली नाहीत. ती योग्य मार्गावर आहेत’, ही केवळ आमच्यावरील गुरुकृपाच आहे.

१२ आ. मुलीचा विवाह ठरवतांना ‘जावई निर्व्यसनी असावा’, असे आतून वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘चांगलाच जावई मिळेल’, अशी दृढ श्रद्धा असणे : आमची मुलगी मेघा हिचा विवाह ठरवतांना मला ‘मुलगा निर्व्यसनी असावा’, असे वाटत होते. एकदा कुणीतरी मला म्हणाले, ‘जर मुलीच्या वाङ्निश्चयानंतर तुम्हाला समजले, ‘मुलगा दारू पिणारा आहे, तर तुम्ही काय कराल ?’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘माझी माझ्या श्री गुरूंवर एवढी श्रद्धा आहे की, ते मेघासाठी असा मुलगा शोधणारच नाहीत.’ प्रत्यक्षात तसेच घडले. मेघाच्या यजमानांना कसलेही व्यसन नाही.

ईश्वराच्या कृपेने प्रत्येक दिवशीच मला एक नवीन अनुभूती येते. त्याविषयी कितीही सांगितले, तरी ते अल्पच आहे.

१२ इ. एका कठीण प्रसंगात अडकलो असतांनाही साधना आणि सेवा नियमितपणे चालू राहाणे : वर्ष २०११ च्या एप्रिल मासात आमची (माझी आणि यजमानांची) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर मे मासापासून वर्ष २०१४ पर्यंत आम्ही सर्व जण एका कठीण प्रसंगात अडकलो होतो; परंतु गुरुकृपेने एवढ्या कठीण काळातही साधना किंवा सेवा यांविषयी आमच्या मनात कधीही कुठलाही विकल्प आला नाही.सच्चिदानंद

माझ्या मनात गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा आहे, ‘गुरुदेव आहेत, तर सगळे काही चांगलेच होणार आहे. परिस्थिती कशीही असली, कितीही कठीण प्रसंग आला, तरी ‘गुरुदेव सर्व काही ठीक करणार आहेत.’

१२ ई. हिंदू अधिवेशनासाठी नियमितपणे येणे आणि तिथे मिळेल ती सेवा करणे : वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा आरंभ झाला. कौटुंबिक स्थिती कठीण असूनही गुरुकृपेने आम्ही प्रत्येक वर्षी अधिवेशनात सहभागी होत होतो आणि तिथे जी सेवा मिळेल ती करत होतो. माझे व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्नही अगदी नियमितपणे होत होते.

१३. साधनेत आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

१३ अ. वर्ष २०११ मध्ये एक शिबिर चालू असतांना ‘देवाला नमस्कार करतांना त्याचा हात मस्तकावर आहे’, असे जाणवणे आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हा उभयतांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली जाणे : वर्ष २०११ मध्ये अनुताई (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि कु. प्रियांका जोशी (आताच्या सौ. प्रियांका राजहंस – वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) धनबादमध्ये एका शिबिरासाठी आल्या होत्या. वर्ष २०११ मध्ये अनुताईंची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. (२८.१०.२०११ या दिवशी अनुताईंची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होऊन त्या समष्टी संत झाल्या आणि ३०.७.२०१५ या दिवशी त्या सद्गुरु झाल्या.) शिबिराच्या काळात ‘भगवंताला नमस्कार करतांना माझ्या मस्तकावर भगवंताचा हात आहे’, असे मला जाणवायचे. तेव्हा एक दिवस मी अनुताईंची वेणी घालत असतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही ध्यानमंदिरात देवाला नमस्कार करत असतांना ‘भगवंताचा हात तुमच्या मस्तकावर आहे’, असे मला जाणवले.’’ हे ऐकून मला एवढा आनंद झाला की, मी तो शब्दांत सांगू शकत नाही. मला अशीच अनुभूती येत होती आणि अनुताईंनीही अक्षरशः तसेच सांगितले. त्याच दिवशी सायंकाळच्या एका कार्यक्रमात प्रथम यजमानांची आणि नंतर माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित केली गेली.

१३ आ. सेवा करतांना बहुतांश वेळा माझे मन निर्विचार आणि शांत असते.’

– (पू.) सौ. सुनीता खेमका, कतरास, झारखंड.

(क्रमश:)

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/767087.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक