Israel Indians Recruitment : इस्रायलमध्ये आतापर्यंत २० सहस्र भारतीय कामगारांची भरती !
१ लाखापर्यंत भारतीय कामगारांची भरती करण्याचे लक्ष्य !
तेल अवीव (इस्रायल) – गाझामध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने भारतातून आतापर्यंत अनुमाने २० सहस्र कामगारांची भरती केली आहे. पॅलेस्टिनी कामगारांचा धोका पाहून इस्रायलने ही भरती केली आहे. त्याच वेळी इस्रायलमध्ये कामाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि युरोपच्या तुलनेत इस्रायलमध्ये अधिक बांधकाम कामगारांचे मृत्यू झाले आहेत, अशी चेतावणी तज्ञांनी दिली आहे.
वार्षिक १६ लाख ४७ सहस्र रुपयांचे वेतन !
उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतून प्रत्येकी १० सहस्र कामगारांची इस्रायलमध्ये भरती करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने गवंडी आणि वेल्डर यांचा समावेश आहे. या कामगारांना प्रतिवर्षी १६ लाख ४७ सहस्र रुपयांचे वेतन देण्यात येणार आहे. इस्रायलने भरतीचा पहिला टप्पा पूर्ण केला असून भारतातून ५० सहस्र ते १ लाख कामगारांची भरती करण्याचा त्याचा मानस आहे.
📌 Around 20 thousand Indian workers recruited in #Israel so far
📌 Target to recruit up to 1 lakh Indian workers with an annual salary of 16 lakh 47 thousand rupees
👉 Despite the threat of death, Indian workers flock to get employment in Israel#IsraelHamasWar #MakeInIndia pic.twitter.com/zsEqAYnf3y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 20, 2024
मृत्यूचा धोका असूनही भारतीय कामगारांची भरतीसाठी गर्दी !
कामगारांच्या हक्कांसाठी काम करणार्या एका संस्थेने नुकतेच उघड केले आहे की, इस्रायलमध्ये प्रति १ लाख बांधकामांच्या ठिकाणी मरणार्या कामगारांची संख्या युरोपच्या तुलनेत २.५ पट अधिक आहे. भारतीय कामगारांना प्रतिमहा अनुमाने १ लाख ३२ सहस्र रुपये मिळणार आहेत. भारतात त्यांना एकाच कामासाठी मिळणार्या एकूण वेतनापेक्षा हे वेतन ६ पट अधिक आहे. त्यामुळेच मृत्यूचा धोका असूनही भारतीय इस्रायलला जाण्यास प्राधान्य देत आहेत आणि भरती प्रक्रियेच्या प्रचंड गर्दी होत आहे.
भारत सरकारचे साहाय्य
‘इस्रायल बिल्डर्स असोसिएशन’चे उपाध्यक्ष हैम फीग्लिन यांच्या मते, भारत सरकारकडून भरती प्रक्रियेत इस्रायलला साहाय्य मिळत आहे. इस्रायलने केलेल्या बहुतेक भरतींमध्ये सुतार आणि गवंडी यांचा समावेश होता. हे सर्व भारतीय पॅलेस्टिनी कामगारांची जागा घेतील, ज्यांना हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.