माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर आणि मनसेच्या अधिवक्त्या अनिता दिघे यांचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप !
हिंदु देवतांचा अपमान केल्याने सुषमा अंधारे यांना विरोध !
अहिल्यानगर – सुषमा अंधारे यांनी स्वत:च्या जुन्या भाषणात हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरल्याने मी त्यांचा निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे, त्यांना मी माझा हिसका दाखवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे १७ फेब्रुवारी या दिवशी नगर दौर्यावर होत्या. अधिवक्त्यांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेल्यावर तेथे स्मिता आष्टेकर आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अंधारे यांनी हिंदु देवतांचा वारंवार अपमान केल्याने आष्टेकर, तसेच मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी अंधारे यांना न्यायालयातच विरोध करून चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
स्मिता आष्टेकर म्हणाल्या की, सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार हिंदु देवतांचा अपमान करण्यात आला आहे. मीही गेल्या ३० वर्षांपासून उद्धव ठाकरे, तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत होते. मी कट्टर हिंदुत्वनिष्ठ महिला आहे; मात्र ज्या महिलेने देवतांचा अपमान केला, तिला बाळासाहेबांनीही स्वीकारले नसते; म्हणूनच आम्ही त्यांना विरोध केला. पक्षाने त्यांना कोणत्या कारणाने पक्षात घेतले ? याच्याशी मला घेणे-देणे नाही; परंतु जर आमच्या देवतांचा अपमान होणार असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही.
जिल्हा न्यायालयात विनाअनुमती प्रवेश !
मनसेच्या अधिवक्त्या अनिता दिघे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून जात त्यांना तेथून बाहेर हुसकावून देण्याचा प्रयत्न केला. या वेळी अधिवक्त्या अनिता दिघे म्हणाल्या की, जिल्हा न्यायालयात येण्यापूर्वी ‘बार असोसिएशन’च्या अध्यक्षांची, न्यायाधिशांची अनुमती घेणे आवश्यक असते; परंतु अंधारे यांनी अनुमती घेतली नाही.
त्यांनी अंधारे यांच्या देवतांविषयी केलेल्या वक्तव्याचाही निषेध व्यक्त केला. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली की, हा विरोध कशासाठी होता ? मला याची जाणीव नाही. कदाचित् छायाचित्रकारांच्या समोर येण्यासाठीच हा ‘स्टंट’ करण्यात आला असावा.
सुषमा अंधारे यांनी देवतांवर केली होती टीका !
‘जो श्रीराम आपल्या बायकोला ७ मासांची गर्भवती असतांना जंगलात सोडतो, तो श्रीराम कसला आमचा देव ?’, असा अपमानास्पद प्रश्न सुषमा अंधारे यांनी पूर्वी केला होता. श्रीकृष्णाचाही त्यांनी असाच अपमान केला होता. यांसारखी अनेक हिंदुद्वेषी विधाने त्यांच्या यापूर्वी प्रसारित झालेल्या काही व्हिडिओमध्ये केली आहेत. (अवतारांच्या प्रत्येक कृतीमागे मोठा कार्यकारणभाव दडलेला आहे. तो समजण्यासाठी साधना करावी लागते. ते समजणे येर्यागबाळ्याचे काम नाही. – संपादक)