महापालिकेला हरित न्यायालयाने ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला !
सांगली येथील कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित केल्याचे प्रकरण
महापालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू !
सांगली, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील कृष्णा नदीत सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडून पाणी प्रदूषित होऊन लाखो माशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पुणे येथील हरित न्यायालयाने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला दोषी ठरवून ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच या प्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
१. वर्ष २०२२ च्या जुलै आणि ऑगस्ट मासांत येथील कृष्णा नदीमध्ये लाखोंच्या संख्येने मृत मासे आढळून आले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यासाठी आणि नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी हरित न्यायालय, पुणे येथे स्वतंत्र भारत पक्षाचे श्री. सुनील फराटे यांच्या वतीने याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.
२. त्यामध्ये हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून चौकशी समितीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता. त्यानुसार काही साखर कारखाने आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांना दोषी ठरवण्यात आले होते.
३. या प्रकरणी न्यायालयाने दंडाची रक्कम आकारणी करून निश्चित करण्यात यावी, असे आदेश दिले होते, त्यानुसार काही कारखान्यांना दंड ठोठावण्यात आलेला होता.
४. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांना महानगरपालिकेचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ फेब्रुवारी या दिवशी नोटिसीद्वारे ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
५. १५ दिवसांच्या आत ६० कोटी रुपये भरण्याचे आदेश दिलेले आहेत, १५ फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये कृष्णा नदी प्रदूषण केल्याविषयी महापालिका आयुक्तांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.