रस्त्याच्या कामात सापडले पेशवेकालीन जलवाहिनी उच्छ्वास !
पुणे – महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने ट्रेझर पार्क ते शिवदर्शनपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जेसीबीने रस्ता खोदत असतांना रस्त्याच्या मध्यभागी पेशवेकालीन जलवाहिनीचा उच्छ्वास सापडला आहे. महापालिकेने या ऐतिहासिक वारशाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने त्याचे संवर्धन करण्याचे काम चालू केले आहे.
पुणे महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण यासाठी ६ पॅकेज सिद्ध करून त्याची स्वतंत्र निविदा काढली आहे. ट्रेझर पार्क ते शिवदर्शन चौक या रस्त्यासाठी ८ कोटी रुपये खर्च येणार आहे. आतापर्यंत १२५ मीटर लांबीच्या रस्त्याचे काम झाले आहे. महापालिकेकडून तावरे बेकरी चौकात खोदकाम चालू असतांना रस्त्याच्या मध्यभागी जुने बांधकाम असलेली जलवाहिनी लागली. अधिकार्यांनी याची तपासणी केली असता ही कात्रजच्या तलावातून शनिवारवाड्याला जाणार्या पेशवेकालीन पाण्याच्या जलवाहिनीचे उच्छ्वास असल्याचे स्पष्ट झाले. या जलवाहिनीतून पाण्याचा प्रवाह चालू असल्याचेही या वेळी निदर्शनास आले.
यावर कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांनी सांगितले की, तावरे बेकरी चौकात रस्त्याच्या मध्यभागी हा उच्छ्वास सापडला आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी तज्ञांच्या साहाय्याने तेथे योग्य पद्धतीने बांधकाम केले जाईल, तसेच तेथे माहितीफलक लावला जाईल.