भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित ‘दक्षिण दिग्विजय ’मोहीम उत्साहात !
सांगली, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – ४ फेब्रुवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने भाग्यनगर (हैद्राबाद) येथे आयोजित केलेली दक्षिण दिग्विजय मोहीम भाग्यलक्ष्मी माता मंदिर ते गोवळकोंडा गड येथे उत्साहात पार पडली. या मोहिमेसाठी विशेष अतिथी म्हणून सरनोबत, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज श्री. सिद्धार्थदादा कंक आणि कंक परिवार, श्री. आणि सौ. प्रदीप पाटील (पानिपत शौर्य समिती पानिपतचे अध्यक्ष), भाग्यनगर गणेश उत्सव समितीचे सचिव डॉ. भगवंत राव यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. ज्या तलवारीने येसाजी कंक यांनी ३५० वर्षांपूर्वी गोवळकोंडा येथे हत्ती मारून इतिहास घडवला, तीच तलवार आज परत याच ठिकाणी कंक परिवारासमवेत होती, तसेच भाजपचे वरिष्ठ नेते सतीश जी अग्रवाल हजर होते.
इमलीबन पार्क येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर भाग्यलक्ष्मी माता मंदिर चारमिनार येथे देवीचे दर्शन आणि आरती करून मोहिमेला प्रारंभ झाला. गोवळकोंडा गड येथील श्री यल्लमादेवीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांना अभिवादन करून मोहिमेची सांगता करण्यात आली. या वेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले यांनी केले.
दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या पदयात्रेच्या वेळी अनेक ठिकाणी स्थानिक शिवभक्तांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले, तसेच स्थानिक शिवभक्तांकडून मोहिमेतील सहभागी शिवभक्तांसाठी अल्पोपहार, पाणी, ग्लुलकोज, सरबत इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथमच तेलंगाणा प्रांतात अशा प्रकारे मोहीम निघाल्यामुळे अनेक ठिकाणी तेलंगाणामधील स्थानिक शिवभक्तांनी मोहिमेचे जंगी स्वागत केले, तसेच त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ’वन्दे मातरम्’ आणि ’जय श्रीराम’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.