क्षुल्लक कारणावरून टोळक्याची तरुणाला मारहाण, चारचाकी गाडी, तसेच महिलेलाही पेटवण्याचा प्रयत्न !

पुणे येथे ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारांचा हैदोस !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तपदाचे दायित्व स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली होती. त्या वेळी सराईत गुन्हेगार पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या सर्व गुन्हेगारांना ‘कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये’, असे बजावण्यात आले होते. ‘अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणीही देण्यात आली होती; पण तरीही पुण्यात गुन्हेगारांचा हैदोस काही न्यून होतांना दिसत नाही. पुण्याच्या खराडी परिसरात ‘रेकॉर्ड’वरील (पोलिसांकडे नोंद असलेले) गुन्हेगारांनी महेश राजे या तरुणाला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. त्यानंतर त्याची चारचाकी गाडी पेटवून दिली, तसेच त्यांनी एका महिलेलाही पेटवण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

महेश राजे हा पुण्यातील वडगाव शेरी परिसरात वास्तव्यास आहे. चारचाकी गाडी उभी (पार्किंग) करण्याच्या सूत्रावरून त्याचा टोळक्यासमवेत वाद झाला. या टोळक्याने महेश याला मारहाण करत त्याची गाडी पेटवून दिली. आरोपींनी गाडी पेटवल्यानंतर तिथे घडलेला प्रकार बघण्यासाठी एक महिला आली. या महिलेवर आरोपींनी पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. महेश राजे या तरुणाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई चालू केली आहे. धीरज सपाटे, आकाश गायकवाड, सुरज बोरूडे, विशाल ससाने यांच्यासह १० अज्ञात आरोपींनी जाळपोळ केल्याची माहिती समोर येत आहे.

संपादकीय भूमिका

  • पुणे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा !
  • गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरले नाही, हे दर्शवणारी घटना !