लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) !
माघ शुक्ल एकादशी (२०.२.२०२४) या दिवशी पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा साधनाप्रवास येथे दिला आहे. त्यांचे बालपण, बालपणापासून त्यांच्यात असलेले दैवी गुण, देवाप्रती असलेली भक्ती, सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागण्याआधी त्यांनी अनुभवलेली देवाची अपार कृपा हे येथे दिले आहे.
(भाग १)
पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. जन्म
‘माझा जन्म माघ शुक्ल एकादशीला (२७.१.१९६१ या दिवशी) बंगालच्या बराकर जिल्ह्याजवळ असलेल्या दिसरगढ येथे झाला.
२. बालपण
आमचे एकत्र कुटुंब होते. आमच्या कुटुंबात आम्ही पणजोबा-आजोबांपासून सर्व कुटुंबीय एकत्रित रहातो. माझ्या आजोबांना २ भाऊ होते. त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या मुलांची कुटुंबे असे सर्व जण एकत्रच रहातो.
३. लहानपणापासून अंगी असलेले चांगले गुण !
३ अ. लहानपणापासून कुठल्याही वस्तूविषयी आसक्ती नसणे : एकत्र कुटुंबात रहात असल्यामुळे आम्ही पुष्कळ बहीण-भावंडे होतो. माझ्या मनात नेहमी इतरांचाच विचार असायचा. लहान असल्यापासूनच मला इतरांना साहाय्य करायला फार आवडते. घरात आम्हा भावंडांमध्ये मी मोठी होते; पण कुठलीही वस्तू ‘मला सर्वांत आधी मिळायला पाहिजे’, असे मला कधीच वाटले नाही. कुठलीही गोष्ट घरात आल्यावर ‘इतरांना मिळाल्यानंतर मी घेईन’, असाच माझा विचार नेहमी असायचा. कधी मी माझ्यासाठी आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी वस्तू आणल्यावर मी माझ्यासाठी घेतलेली वस्तू माझ्या बहिणीला आवडली, तर मी अगदी सहजतेने माझ्यासाठी घेतलेली वस्तू तिला देत असे. अगदी लहान असल्यापासूनच माझ्या मनात कुठल्याही वस्तूविषयी आसक्ती नव्हती.
३ आ. शेजारी रहाणार्या आजींना त्यांच्या कामात साहाय्य करण्यास आवडणे : आमच्या घरी कामे करण्यासाठी बरेच गृहकृत्य साहाय्यक (नोकर-चाकर) असल्यामुळे घरी कधी काही काम करण्यासाठी माझी आवश्यकताच नसायची; परंतु आमच्या घराशेजारी एक आजी एकट्याच रहात होत्या. त्यांना मूळबाळ नव्हते. मला त्यांना त्यांचे घर झाडायला आणि त्यांच्या इतर कामात साहाय्य करायला आवडत असे.
३ इ. अन्नपूर्णादेवी जसे सर्वांना जेवू घातल्यावर स्वतः जेवते, त्याप्रमाणे घरातील सर्व लहान-मोठ्यांची आणि गृहकृत्य साहाय्यकांचीही जेवणे झाल्यावर जेवणे : घरात सर्वांचे भोजन झाल्यानंतर सर्वांत शेवटी मी भोजन करत असे. माझा तो गुण अजूनही आहे. कितीही व्यस्त असो, कुठलाही कार्यक्रम असो किंवा इतर दिवशीही सर्वांची जेवणे झाल्यानंतरच मी भोजन करते. ‘भूक लागली; म्हणून मी आधीच खाऊन घेतले’, असे माझ्याकडून कधीच होत नाही. ‘मी गृहिणी आहे. गृहिणीमध्ये अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व असते. अन्नपूर्णादेवी सर्वांना खाऊ घातल्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण करते. घरातील कुणाला अन्न न्यून पडता कामा नये. सर्व कुटुंबियांचे आणि घरातील गृहकृत्य साहाय्यकांचे भोजन झाल्यानंतरच मी अन्न ग्रहण केले पाहिजे’, असे मला वाटते.
४. कुटुंबातील वातावरण आध्यात्मिक असल्यामुळे देवाची आवड असणे !
४ अ. कुटुंबातील वातावरण आध्यात्मिक असणे आणि सर्व जण खाटू श्यामबाबांची भक्ती करत असणे : प्रथमपासून आमच्या कुटुंबातील पूर्ण वातावरण आध्यात्मिकच आहे. आमच्या घरी पणजोबा-आजोबा यांच्या काळापासून खाटू श्यामबाबांची (कलियुगातील श्रीकृष्णाच्या रूपाची) उपासना केली जाते. खाटू श्यामबाबांचे झेंडे उचलणे, कलश यात्रा, पायी यात्रा इत्यादी सर्व गोष्टीत आम्ही सर्व कुटुंबीय मनापासून सहभागी होत असू. माझे मन लहानपणापासूनच पूजा आणि आरती यात रमत होते. मी सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करणे, खाटू श्यामबाबांची पोथी वाचणे, हनुमान चालीसा म्हणणे, व्रते करणे इत्यादी करत असे. लहानपणापासूनच माझ्या मनात खाटू श्यामबाबांच्या प्रती ओढ होती. ईश्वराच्या कृपेने माझे पालन-पोषण सात्त्विक वातावरणात झाले.
४ आ. कीर्तनाची आवड असणे : मला कीर्तन ऐकायची पुष्कळ आवड होती. मी लहान असतांना आमच्या घराशेजारी असलेल्या ‘बराकर’ येथे २४ घंटे कीर्तन होत असे. मला ‘सर्व वेळ कीर्तनच ऐकत बसावे’, असे वाटत असे.
५. शिक्षण
माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. मी शिक्षणात सर्वसाधारण होते.
६. विवाह
बारावीनंतर माझा विवाह पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत) यांच्याशी झाला.
७. साधनेत नसतांनाही भगवंताची अनुभवलेली अपार कृपा !
७ अ. यजमान विवाहापूर्वी मांसाहार करत असणे; पण ईश्वराच्या कृपेने विवाह ठरल्यावर त्यांची ती सवय सुटणे : आमचा विवाह ठरण्यापूर्वी यजमान मांसाहार करत होते; परंतु आमचा वाङ्निश्चय झाल्यानंतर त्यांची मांसाहार करण्याची सवय पूर्णपणे सुटली. ‘यजमान मांसाहार करत होते’, ही गोष्ट मला आमच्या विवाहानंतर ठाऊक झाली. त्या काळी विवाहापूर्वी आम्हाला वराविषयी किंवा वराकडील लोकांविषयी फार काही ठाऊक नसायचे. आमचा विवाह ठरल्यावर ‘यजमानांचा मांसाहार करणे बंद झाले’, ही गोष्ट समजल्यावर मला ईश्वराप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. प्रयत्न करूनही ‘ही गोष्ट थांबवणे’ मला साध्य झाले नसते; मात्र ती गोष्ट आमच्या विवाहाआधीच ईश्वराने बंद करून माझ्यावर केवढी मोठी कृपा केली आहे. अलीकडे लोकांना ‘मांसाहार करणे’ ही गोष्ट फारच क्षुल्लक वाटते; परंतु माझ्यासाठी ‘मांसाहार करणे’ ही फारच मोठी गोष्ट होती. ‘कुणी मांसाहार करू शकतो’, असा मी विचारही करू शकत नव्हते. त्यामुळे ‘विवाहाआधीच यजमानांची ही सवय सुटली’ हे समजल्यावर ‘भगवंत माझ्यासाठी किती करत आहे ?’ या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
७ आ. कामाच्या व्यस्ततेमुळे यजमान पू. प्रदीप खेमका अनेक वेळा घरी उशिरा येत असणे, ‘त्यांचे अपहरण झाले, त्या दिवशी देवाच्या कृपेने ते सुखरूप घरी परत आल्यामुळे त्यांचे अपहरण झाले’, हे न कळणे : वर्ष १९९२ मध्ये व्यावसायिक वैमनस्यामुळे कुणीतरी यजमानांचे (पू. प्रदीप खेमका यांचे) अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी यजमानांचे रात्री ८ – ९ वाजता अपहरण केले; पण ईश्वराच्या कृपेने त्याच रात्री २ – ३ वाजता यजमान सुखरूप घरी परत आले. त्या काळात यजमानांना कामाच्या व्यस्ततेमुळे घरी परतण्यास बरीच रात्र होत असे. त्यामुळे यजमान त्या रात्री उशिरा घरी परत आले, तेव्हा मला वाटले, ‘ते काम संपवून आताच घरी परत आले आहेत.’ त्यामुळे ही घटना झाल्यावर पुष्कळ दिवस मला यजमानांचे अपहरण झाल्याविषयी ठाऊकच नव्हते. यजमान घरी येईपर्यंत मी झोपत नसे. मी त्यांची वाट पहात सज्जात उभी रहायचे. त्या रात्री ३ – ३.३० वाजता यजमान घरी परत आल्यावर माझ्या मनात ‘यजमानांना घरी यायला एवढा उशीर का होतो ?’, एवढाच विचार आला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या नणंदबाईंनी मला ‘त्या दिवशी यजमानांचे अपहरण झाले होते’, असे सांगितले. तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसला नाही; पण नंतर ‘ईश्वराने त्यांचे रक्षण केले’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
७ इ. सासरी आणि माहेरी दोन्हीकडील लोकांनी गुरुमंत्र घेतलेला असूनही स्वतःला गुरुमंत्र न मिळणे, काही काळाने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर ते ईश्वराचेच नियोजन असल्याचे लक्षात येणे : माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी सर्वांनीच गुरुमंत्र घेतला होता. ‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागण्यापूर्वी माझ्या जीवनात दुसरे कुणी गुरु आले नाहीत’, ही ईश्वराचीच लीला होती. मी कधी कुठल्याही ज्योतिष्याला माझा हात दाखवून माझ्या भविष्याविषयी काही विचारले नाही. एकदा मी माझ्या आईकडे गेले होते. तेव्हा तिचे गुरु घरी येणार होते. आई मला म्हणाली, ‘‘तूही गुरुमंत्र घे.’’ योगायोगाने मी आईच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचे गुरु घरी आले. आईने मला तिचे गुरु घरी आले असल्याचे भ्रमणभाष करून सांगितले; म्हणून मी पुन्हा तिच्या घरी गेले; परंतु मी घरी पोचण्यापूर्वीच तिचे गुरु तिथून निघून गेले. तेव्हा ‘माझ्या नशिबीच गुरूंचा योग नसेल’, या विचाराने मला फार वाईट वाटले होते. आता विचार केल्यावर ‘ती माझ्यावरील ईश्वराची कृपाच होती. ईश्वराने माझ्या भाग्यात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे माझे गुरु म्हणून मला सान्निध्य लाभणार आहे’, असा योग लिहिला होता; म्हणून तसे झाले’, असे माझ्या लक्षात आले.’
– (पू.) सौ. सुनीता खेमका, कतरास, झारखंड. (२.१.२०२०)
(क्रमश:)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/766713.html