पत्नीला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले देवद (पनवेल) आश्रमातील श्री. नारायण पाटील (वय ३४ वर्षे) !

माघ शुक्ल एकादशी (२०.२.२०२४) या दिवशी देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. नारायण पाटील यांचा ३४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे) यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. नारायण पाटील

श्री. नारायण पाटील यांना ३४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. लक्ष्मी पाटील

१. मनमोकळेपणा

‘माझे यजमान श्री. नारायण पाटील यांचा स्वभाव मनमोकळा आहे. यजमान त्यांच्या मनात जे असेल, ते न लपवता मोकळेपणाने सांगतात. ते इतरांशी लगेच जवळीकही साधतात.

२. प्रामाणिक

पूर्वी ते एका आस्थापनात नोकरी करत होते. तेव्हा कामासाठी बाहेर गेल्यावर वैयक्तिक कारणांसाठी केलेल्या व्ययाचे पैसे ते आस्थापनाकडून न घेता केवळ आस्थापनाच्या कामासाठी केलेला व्यय घेत असत. त्यांच्या प्रामाणिक वर्तनामुळे त्यांच्या उत्तरदायी अधिकार्‍यांना त्यांच्याविषयी पुष्कळ आदर आणि विश्वास होता.

३. काटकसरी

त्यांचा एक सदरा मळकट झाला होता आणि त्यावर सुताचे गोळेही आले होते; म्हणून मी त्यांना म्हणाले, ‘‘असा सदरा वापरू नका.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सदरा मळकट झाला आहे, त्यावर गोळे आले आहेत; पण फाटला नाही. मला सेवा करतांना चांगले कपडे घालून चालत नाही. त्यामुळे हाच सदरा मी अजून वापरू शकतो. आपले गुरुदेव किती काटकसरी आहेत ? ते जुने कपडेही नीट शिवून वापरतात.’’

४. परिस्थिती स्वीकारणे

मागील ८ वर्षे यजमान देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत; पण सध्या माझे सासरे रुग्णाईत असल्यामुळे त्यांना काही कालावधीसाठी घरी रहावे लागत आहे. त्यांना वडिलांची सेवा आणि शेतातील कामेही करावी लागत आहेत. त्यांना शारीरिक त्रासही होतात; पण त्याविषयी त्यांचे कधीच गार्‍हाणे नसते. ते साधना आणि कर्तव्य म्हणून सर्व काही मनापासून करतात.

५. पत्नीला साधनेसाठी साहाय्य करणे

माझे सासरे रुग्णाईत असल्यामुळे मागील ८ मासांपासून आम्हाला (मला आणि यजमानांना) घरी रहावे लागत आहे. त्यांना शेतातील आणि मला घरातील कामे करावी लागतात. शेतातील कामे जेव्हा न्यून होतात, तेव्हा ते घरची कामे करतात आणि मला आश्रमात सेवेसाठी पाठवतात. मी आश्रमात असतांना ते महत्त्वाचे काम असेल, तरच मला भ्रमणभाष करतात किंवा संदेश पाठवतात. ‘मी साधनेत न्यून पडू नये, पुढे जावे आणि त्यांच्यामुळे माझ्या साधनेत अडथळा येऊ नये’, यांसाठी ते मला सर्व प्रकारे साहाय्य करतात. ते मला म्हणतात, ‘‘तू आश्रमात राहून गुरुदेवांना अपेक्षित अशी अधिकाधिक सेवा कर.’’

६. पत्नीकडून अपेक्षा नसणे

पत्नी म्हणून त्यांच्या माझ्याकडून कधीच काही अपेक्षा नसतात. ‘मी त्यांना भ्रमणभाष करावा, त्यांना वस्तू भेट द्यावी, त्यांना वेळ द्यावा, त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये साहाय्य करावे’, असे त्यांना कधीही वाटत नाही. पत्नी म्हणून ते माझ्यावर कुठल्याही प्रसंगात अधिकार दाखवत नाहीत.

७. तत्त्वनिष्ठ

अ. ‘आमच्या विवाहाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत यजमान माझ्याशी कधीही मानसिक स्तरावर वागले नाहीत. ते माझ्या चुका किंवा ‘मी कुठे न्यून पडते ?’, याविषयी मला लगेच सांगतात.

आ. ‘आपण सनातनचे साधक आहोत. आपले वर्तन नेहमी गुरुदेवांच्या शिकवणीनुसारच  असावे’, याविषयी ते नेहमी सतर्क असतात. ‘एखाद्या साधकांचे वर्तन साधनेला धरून नसेल, तर ‘त्याला चूक सांगून साहाय्य करूया’, असा त्यांचा विचार असतो.

८. समाधानी

त्यांना मायेतील कुठल्याही वस्तूंची आसक्ती नाही. ‘आवश्यक तेवढे मिळाले, की पुरे झाले’, असा त्यांचा विचार असतो. त्यामुळे ते समाधानी असतात.

९. धर्मप्रेम

त्यांना धर्माविषयी पुष्कळ अभिमान आहे. त्यांना देवता आणि धर्म यांचे विडंबन झाल्याचे कळल्यावर पुष्कळ चीड येते. भ्रमणभाषवर याविषयी काही आले, तर त्याविषयी जागृती केल्याविना त्यांना चैन पडत नाही. साधनेत येण्यापूर्वी ते ‘श्रीराम सेना’ आणि ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनांच्या धर्मकार्यात सहभागी होत होते.

१०. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम !

यजमानांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पुष्कळ प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी आस्थापनात काम करत असतांना त्यांचा अपघात झाला होता. ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत होते. नंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्र त्यांना म्हणाले, ‘‘त्या स्थितीत तू छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चा ध्येयमंत्र (टीप) म्हणत होतास.’’

(टीप – ‘शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।’,

११. सेवेची तळमळ 

यजमान देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागण्यापूर्वी ते एका आस्थापनात नोकरी करत होते. त्यांना आश्रमातील सेवेचा किंवा आश्रम जीवनाचा अनुभव नव्हता. तरीही त्यांनी त्यांना सांगितलेल्या सेवा शिकून घेतल्या. ते मिळेल, ती सेवा तळमळीने, भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पूर्णवेळ साधना करण्यापूर्वी ते बेळगाव जवळील ‘नागेणहट्टी’ या गावी प्रसारात मिळेल, ती सेवा करत होते. नंतर ते तिथे दायित्व घेऊन सेवा करू लागले. त्यांना ‘आपण प्रवचन घेऊ शकत नाही’, असे वाटायचे; पण नंतर त्यांनी पुढाकार घेऊन प्रवचनाचा सराव केला अन् प्रवचने घेतली.

१२. कृतज्ञताभाव 

नातेवाईक किंवा साधक यांनी त्यांच्यासाठी काही केले, तर त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते. ते नेहमीच त्यांच्या स्मरणात रहाते. ‘मी त्यांच्यासाठी काय करू शकतो ?’, असाच ते नेहमी विचार करतात. ते त्यांना जितके साहाय्य करता येईल, तितके करण्याचा प्रयत्न करतात.

१३. श्री. नारायण यांच्या मनात देवद आश्रमातील आणि प्रसारातील संत अन् साधक यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे.

१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा

माझ्या सासरे रुग्णाईत असतांना अनेक आर्थिक आणि अन्य अडचणी आल्या. तेव्हा ‘प.पू. गुरुदेव काहीतरी मार्ग काढणारच’, अशी त्यांची श्रद्धा होती आणि खरेच गुरुकृपेने त्यांना आलेल्या अडचणी सुटल्या. कठीण परिस्थितीतही ते गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून स्थिर रहातात. माझ्या सासर्‍यांना अर्धांगवायू झाला आहे. त्यांना उपचारासाठी प्रत्येक मासाला चारचाकीने दुसर्‍या गावी रुग्णालयात न्यावे लागते. एकदा सासर्‍यांना दुसर्‍या दिवशी पहाटे रुग्णालयात घेऊन जायचे होते. आदल्या रात्री ८ वाजेपर्यंत प्रयत्न करूनही चारचाकी आणि चालक मिळत नव्हता. तेव्हाही श्री. नारायण यांना ताण आला नाही किंवा ते अस्थिर झाले नाहीत. ‘गुरुदेव मला साहाय्य करतीलच’, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यानंतर रात्री ९ वाजता आम्हाला चारचाकी मिळाली आणि आमची अडचण सुटली.

१५. कृतज्ञता

‘हे गुरुदेव, तुम्ही मला यजमानांच्या रूपात माझ्या साधनेसाठी तळमळीने साहाय्य करणारा सहसाधक दिला आहे’, यासाठी तुमच्या परम पावन चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– सौ. लक्ष्मी पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, देवद ,पनवेल. (१८.१२.२०२३)