छत्रपती शिवरायांच्या राजकीय धोरणांचे विविध पैलू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने…
छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्रात स्वतःची भूमिका मांडताना म्हणतात, ‘परमेश्वर हाच सकल सृष्टीचा निर्माता आहे. त्यानेच राजाला निर्माण केले. राजाचे जे राज्य त्या राज्यात विविध प्रकारचे, विविध स्वभावाचे, विचारांचे, प्रकृतीचे, प्रवृत्तीचे, उपासनापंथाचे लोक रहाणार, त्या सर्वांचे रक्षण करणारा आणि त्यांच्यात कलह, वाद , भांडणे निर्माण झाली, तर ती मिटवणारा अन् देशात शांतता प्रस्थापित करणारा राज्यकर्ता हवा. तो आपल्या प्रजेला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेणारा असला पाहिजे. प्रजेला स्वधर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही दडपणाविना मिळायला हवे. प्रजेला पुत्रवत् समजून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणार्या राजाला भगवंताने राज्य दिलेले आहे. त्याने उन्मत्त आणि मदारूढ न होता राज्यकारभार करावा.’ छत्रपती शिवरायांच्या लेखी असे राज्य निर्माण व्हावे हीच ‘श्रीं’ची इच्छा !
१. छत्रपती शिवरायांचे युद्धाविषयीचे विशिष्ट धोरण
छत्रपती शिवरायांनी सज्जनांचे रक्षण, दुष्ट, खलप्रवृत्तीचे निर्दालन करण्याच्या हेतूनेच हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेक शत्रू होते. दक्षिण प्रांतातील आदिलशहा, कुतुबशहा, जंजिरेकर सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, रामनगरकर, सोंधे, बेदनूर आदी पाळेगार संस्थाने त्यासह सह्याद्रीच्या आधाराने बलदंड होऊन बसलेले चंद्रराव मोरे, शिर्के, सावंत, दळवी, निंबाळकर, घाटगे अशी वतनदार मंडळी ! आणि उत्तरेला असलेले मोगलांचे बलाढ्य साम्राज्य ! या सर्वांशी छत्रपती शिवरायांना संघर्ष करावाच लागला. हा संघर्ष अटळ होता. हा संघर्ष करतांना छत्रपती शिवरायांनी एक विशिष्ट धोरण निश्चित केले होते, ते असे…
अ. आपल्या समोरचा शत्रू पराक्रमी असून त्याच्याकडे भरपूर युद्धसामुग्री आहे. त्याचे बुद्धीवैभव ही श्रेष्ठ आहे. तरीही त्याचे दडपण आपण घ्यायचे नाही.
आ. अनेक वेळा थेट आक्रमण करून त्यांच्यावर वचक बसवायचा.
इ. शत्रूला बेसावध ठेवून त्याच्यावर अचानक आक्रमण करायचे.
ई. आपल्या शत्रूमध्ये परस्पर कलह लावून द्यायचा.
उ. भेदनीतीचे तंत्र अनुसरायचे.
ऊ. कधी कधी शत्रूच्या छावणीत अचानक घुसून त्याच्याशी युद्ध करायचे.
ए. शत्रूला कोंडीत गाठून पराभूत करायचे. कधी शत्रूच्या भेटीला जायचे, तर कधी शत्रूला स्वतःच्या भेटीस बोलवायचे.
ऐ. जलदुर्गांची निर्मीती करून आरमार दल उभे करायचे. नकाशे सिद्ध करायचे.
ओ. शत्रूची अधिकाधिक हानी करण्याचे धोरण ठेवणे आणि राष्ट्रहिताला बाधा होणार नाही, याची काळजी घ्यायची. विविध ठिकाणी गड-दुर्ग उभे करायचे. सैन्यात हौतात्म्याची ओढ निर्माण न करता विजयाची ओढ निर्माण करायची.
२. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे एक क्रांतीकारक प्रसंग !
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मध्ययुगातील हिंदूंच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा करणारा क्रांतीकारक प्रसंग होय ! यवनांनी (इस्लामी आक्रमकांनी) आक्रमण करून हिंदुस्थानात यवनी सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे येथील हिंदु संस्कृती, परंपरा लयाला जाण्याची वेळ आली होती. अशा वेळी ‘या संस्कृतीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचे दायित्व स्वतःचे आहे’, असे मानून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली होती. त्या शपथेच्या पूर्ततेचा तो क्षण होता.
रामायण आणि महाभारत यांत अष्टप्रधान मंडळाची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. दशरथराजा जवळ अष्टप्रधान मंडळ होते. तसेच महाभारतातील ‘शांतीपर्वा’त ‘राजाने ८ मंत्र्यांसह विचारविनिमय करावा’, असे म्हटले आहे. त्याला अनुसरून छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतल्यानंतर लगेच अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. शुक्रनीती सांगते, ‘मंत्रीमंडळात ८ ते १० मंत्री असावेत.’
छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून हिंदवी अस्मितेची प्रतिष्ठापना केली. तो मंगलमय क्षण होता. या क्षणाची स्मृति सदैव रहावी; म्हणून त्या दिवसापासून, म्हणजे ‘शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’पासून छत्रपती शिवरायांनी नवीन कालगणना निर्देशित करणारा नवा शक आरंभ केला. त्या शकाचे नाव ‘राज्याभिषेक शक’ असे ठेवण्यात आले. या शकलेखन पद्धतीच्या आरंभी ‘स्वस्ति श्री’ असे मंगल सूचक शब्द जोडण्यात आले. छत्रपती शिवरायांनी या नव्या शकाला स्वतःचे नाव दिले नाही, तर स्मरणीय आणि अभिलक्षणीय अशी राज्याभिषेकाची घटना तिचे नाव दिले, हे महत्त्वाचे आहे.
३. राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करणारे छत्रपती शिवराय !
छत्रपती शिवरायांनी स्वतःचा उल्लेख ‘क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शिवछत्रपती’, या बिरुदाने केलेला आढळतो. यावनी राजवटीमुळे मराठी भाषेत फारसी शब्दांचा सुळसुळाट झाला होता. मूळ संस्कृतप्रचुर भाषा नष्ट होत चालली होती. तिच्या रक्षणार्थ छत्रपती शिवरायांनी रघुनाथपंत हनुमंते यांना राज्यव्यवहार कोश रचण्याची आज्ञा केली. पारतंत्र्य नष्ट करून स्वराज्याची स्थापना करताच परकियांच्या सर्व खुणा नष्ट करायच्या असतात, याचा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांनी घालून दिला. राज्यव्यवहार कोश निर्माण केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी पंचांग शुद्धीसाठी ‘करण कौस्तुभ’ नावाचा ग्रंथ निर्माण केला. या ग्रंथाच्या निर्मितीचे दायित्व कृष्णा ज्योतिष यांच्याकडे सोपवले. परकीय आक्रमकांना परास्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या शककर्त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा !
छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देशातील परकीय आक्रमकांची स्मृति पूर्णपणे ज्या दिवशी नष्ट होतील. तो दिवस हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनियाचा दिवस असेल.
(संदर्भ – ‘शककर्ते शिवराय’, लेखक – विजयराव देशमुख)
४. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाचा व्यय शत्रूकडून केला वसूल !
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसांतच त्यांना हेरांकडून माहिती मिळाली की, औरंगजेब बादशाहचा सरदार बहादूरखान याची पेडगावला छावणी आहे. त्याच्याजवळ १ कोटी रुपयांची रोकड आहे. याखेरीज त्याने बादशाहला भेट देण्यासाठी २०० अरबी घोडे त्याच्या छावणीत ठेवले आहेत. छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा युद्धाची करामत दाखवली. त्यांनी बहादूरखानाला धडा शिकवण्यासाठी सरदार हंबीरराव मोहिते यांच्याकडे मोहिमेचे दायित्व दिले. ९ सहस्र घोडेस्वारांना बरोबर घेऊन हंबीरराव मोहिते निघाले. त्यांनी त्यांच्या ९ सहस्र घोडेस्वारांच्या २ तुकड्या केल्या. एका तुकडीत २ सहस्र आणि दुसर्या तुकडीत ७ सहस्र घोडेस्वार होते. ‘बहादूरखानाच्या छावणीवर २ सहस्र घोडेस्वारांनी थेट आक्रमण करण्यासाठी पुढे जाण्याचे नाटक करायचे. त्याच वेळी ७ सहस्र घोडेस्वारांनी दबा धरून बसायचे. बहादूरखान प्रतिकारासाठी चालून आला की, २ सहस्र घोडेस्वारांनी उलट दिशेने पळून जायचे. त्यांचा पाठलाग करण्यासाठी बहादूरखान त्यांच्या मागे लागला की, दबा धरून बसलेल्या ७ सहस्र घोडेस्वारांनी त्याच्या छावणीवर छापा घालून ती लुटायची’, अशी योजना आखली. ती पूर्णपणे यशस्वी झाली. बहादूरखानाकडील रोकड आणि २०० अरबी घोडे मराठ्यांना मिळाले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेला व्यय औरंगजेबाकडून वसूल केला.
५. सुरत लुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी इनायतखानाला दिलेला निरोप
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर ते काही काळ सुरतेत होते. त्या वेळी सुरतचा औरंगजेबाचा सुभेदार इनायतखानने त्याचा वकील छत्रपती शिवरायांकडे पाठवला. त्या वकीलाने छत्रपती शिवरायांना इनायतखानाचा एक निरोप दिला. तो असा, ‘तुम्ही सुरतेत घुसून जी लुटालूट केली, त्याबद्दल तुम्हाला सम्राट क्षमा करणार नाही. तथापि अजूनही तुमच्या फौजा सुरतेत आहेत. त्या सुरतेतून हलवल्या, तर सुभेदार झाला प्रकार विसरून तुमच्याबद्दल सम्राटाकडे शिफारस करील. या अटी तुम्ही पाळल्या, तर सुभेदार योग्य ती खंडणी देण्यास सिद्ध आहे; पण तुम्ही जी लूट केली, ती तुम्हाला परत करावी लागेल.’
इनायतखानाचा हा निरोप ऐकल्यावर छत्रपती शिवराय संतापले आणि त्यांनी त्या वकिलाला सांगितले, ‘इनायतखानाचा निरोप मी ऐकला. आता सुरतेच्या सुभेदाराला माझा निरोप सांगा. केवढी बेशरम माणसे आहात तुम्ही ! हा इनायतखान सुरतेचा सुभेदार ! संकट येताच हा रक्षणकर्ता बायकांसारखा किल्ल्यात जाऊन लपला ! प्रजेला बेवारस करून मोकळा झाला. आता तो आम्हाला अटी घालतो, त्या कशाच्या जोरावर ? सुरत आज आमच्या हाती आहे. इनायतखानाच्या अटी मान्य करायला आम्ही त्याच्यासारखे नामर्द नाही.’ हे अनपेक्षित उत्तर ऐकताच दूताच्या वेषातील वकील छत्रपती शिवरायांवर आक्रमण करण्यासाठी पुढे सरसावला. त्याच्या हातात खंजीर होता. त्या खंजिराचा वार तो छत्रपती शिवरायांवर करणार, तोच शिवरायांच्या अंगरक्षकाने त्या वकिलाचा हात खङ्गाने एका घावात तोडून टाकला !
सुरत सोडून स्वराज्यात येतांना छत्रपती शिवराय तेथील व्यापार्यांना म्हणाले, ‘तुमच्या बादशाहला माझा निरोप देण्यासाठी मी तुम्हाला जिवंत ठेवले आहे. तुमच्या बादशाहला सांगा, तुमची सुरत बेसूरत केली. ही भूमी पुरातन हिंदूंची आहे. तुमचे दक्षिणेतही काही नाही. तुम्ही जिथे राज्य करता ती देहलीसुद्धा तुमची नाही. ही पुरातन हिंदूंची आहे. एक ना एक दिवस तेही आम्ही सिद्ध करून दाखवू.’
(संदर्भ : ‘श्रीमान योगी’ पुस्तक)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.