दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडे दुर्लक्ष करू नका ! – मानसोपचार तज्ञ; आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्या गाडीचा अपघात !…
१३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडे दुर्लक्ष करू नका ! – मानसोपचार तज्ञ
नाशिक – गेल्या १० वर्षांत १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण, व्यसनाधीनता, नैराश्य आणि त्यातून आत्महत्येचे वाढणारे प्रमाण हे चिंताजनक असून यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा, असा सल्ला येथील मानसोपचार तज्ञांनी पालकांना दिला आहे.
आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्या गाडीचा अपघात !
गोंदिया – जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अंत्यदर्शनाला जाणार्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. एका धरणाच्या कालव्यामध्ये गाडी कोसळली असून कालव्यामध्ये पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा अटकेत !
नागपूर – सामाजिक माध्यमांतून ओळख करून १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार्या आणि लग्नाचे आमीष दाखवून तिच्यासमवेत शारीरिक संबंध ठेवणार्या शिवम मेहरा (वय १९ वर्षे) याला अटक केली आहे. मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघड झाला. त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशांना कारागृहात डांबायला हवे !
मद्यपी अधिकार्यावर कारवाईच नाही !
अग्नीशमनदलाच्या कार्यालयातील प्रकार !
अमळनेर (जिल्हा जळगाव) – येथील नगर परिषदेच्या अग्नीशमनदलाच्या कार्यालयातील अधिकारी दारू पित असल्याचा व्हिडिओ एका तरुणाने चित्रीत करून प्रसारित केला. या प्रकरणी त्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे लेखी तक्रारही केली होती; पण संबंधित अधिकार्यावर कारवाई न झाल्याने त्याने उपोषणाची चेतावणी दिली. (कारवाई न करणार्यांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक )
असे मद्यपी अधिकारी त्यांचे कर्तव्य कसे पार पाडणार ?
देऊळगाव दुधाटे (जिल्हा परभणी) येथे मराठा आंदोलकांनी बस जाळली !
परभणी – येथे मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन मंडळाची बस जाळली आहे. जिल्ह्यात २ दिवस रस्ता बंद आंदोलने चालू आहेत. १७ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ३ वाजता पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील गावकर्यांनी बसला आग लावली. त्यात बस पूर्ण जळून खाक झाली आहे.
अमरावती येथे मिनी बसचा अपघात !
४ खेळाडूंचा मृत्यू, तर १० जण घायाळ
अमरावती – शहरातील नांदगाव-खंडेश्वर रस्त्यावर सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि छोट्या बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ४ क्रिकेट खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १० जण घायाळ झाले आहेत. अपघातातील घायाळ नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी भरती केले असून तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत, तर काही गंभीर घायाळांना अमरावती येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अमरावती येथील खेळाडू हे यवतमाळ येथे चालू असलेल्या एका स्पर्धेसाठी छोट्या बसने निघाले होते.