गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्यशासनाकडून ११ कोटी ७७ लाख निधी वितरित ! – सुधीर मुनगंटीवार, मंत्री
नाशिक – वाराणसी, हृषिकेश आणि हरिद्वार येथील जगप्रसिद्ध गंगाआरतीप्रमाणे ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या गोदावरी नदीच्या आरतीचाही कायमस्वरूपी उपक्रम चालू करावा, अशी संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्याच्या वतीने जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला आहे.
१. याची कार्यवाही जलदगतीने होण्यासाठी स्थानिक समिती गठित करून मुंबई आणि नाशिक येथे संबंधितांसमवेत मंत्री मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या.
२. २६ जानेवारी या दिवशी मंत्री मुनगंटीवार यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या, तर १ फेब्रुवारीच्या बैठकीत प्रगतीचा आढावा घेतला.
३. नाशिक जिल्हाधिकार्यांनी ५ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सिद्ध केलेले अंदाजपत्रक शासनास सादर केले होते.
४. ६ फेब्रुवारी या दिवशी मंत्री मुनगंटीवार यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीची बैठक घेऊन गोदा आरतीच्या कामासाठी आवश्यक निधी देण्यास मान्यता दिली.
५. जिल्हाधिकार्यांनी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन १४ फेब्रुवारी या दिवशी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदा आरतीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
६. पायाभूत सोयींसाठीचा निधी मिळाल्याने गोदा आरतीसाठी ११ प्लॅटफॉर्म सिद्ध करणे, तसेच अन्य कामे वेगाने करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.