२० फेब्रुवारीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते
जालना – ‘मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे’, तसेच ‘सरकारने २० फेब्रुवारीला आरक्षण दिले, तरी मराठ्यांना ‘ओबीसी’तूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन चालूच राहील’, अशी चेतावणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १८ फेब्रुवारी या दिवशी ९ वा दिवस आहे. सकाळी वैद्यकीय पथकाने त्यांचा रक्तदाब पडताळला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, सगेसोयर्यांविषयी सरकारने कार्यवाही केली पाहिजे. ज्यांची नोंद मिळाली, त्या नोंदींच्या आधारे सगेसोयर्यांना आरक्षण द्यावे. २०, २१ फेब्रुवारी या दिवशी सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची कार्यवाही करावी. तसे न केल्यास आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल. मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण पाहिजे, कारण मराठे ‘ओबीसी’मध्येच आहेत.
१००-२०० लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल. ६ कोटी मराठ्यांना ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याची मागणी आहे. सरकारने २० फेब्रुवारी या दिवशी आरक्षण दिले, तरी मराठ्यांना ‘ओबीसी’तूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन चालू राहील.