पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या, ३ पोलिसांना मारहाण !
आरोपीला घेऊन जाणार्या जामखेड पोलिसांच्या वाहनावर केज येथे आक्रमण !
९ जणांवर गुन्हा नोंद
केज (जिल्हा बीड) – तालुक्यातील लव्हुरी येथील पसार आरोपीला घेऊन निघालेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर आक्रमण करण्यात आले. संशयितांनी ३ पोलिसांना मारहाण करत त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. ही घटना केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २.३० वाजता घडली. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
जामखेड पोलिसांच्या रेकॉर्डवरील फसवणुकीच्या गुन्ह्यात पसार आरोपी प्रतीक चाळक (रा. लव्हुरी, ता. केज) याच्या शोधासाठी जामखेड पोलिसांचे ४ जणांचे पथक खासगी वाहनाने गेले होते. त्या वेळी ही घटना घडली. संशयितांनी पोलीस जमादार प्रवीण इंगळे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर बेल्हेकर आणि पोलीस शिपाई कुलदीप घोळवे यांना मारहाण केली. आरोपी प्रतीक चाळक याला जीपबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत जीप मागे घेत तात्काळ पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी संशयितांची नावे आरोपीकडून जाणून घेतली. वाहनावर दगडफेक करणार्यांत अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहित चाळक, मुन्ना बचाटे (सर्व रा. लव्हुरी) आणि ३ अनोळखी अशा ९ जणांवर गुन्हा नोंद केला.
संपादकीय भूमिका :पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करेपर्यंत मजल जाते, यावरून पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! |