वर्ष २०२३ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या दशमहाविद्या यागांच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती
‘१५ ते २४.१०.२०२३ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन दशमहाविद्या याग झाले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. १७.१०.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. ‘यज्ञकुंडातून बाहेर पडणार्या अग्नीच्या ज्वाळांतून साधकांना चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे : १७.१०.२०२३ या दिवशी ललिता त्रिपुरासुंदरी देवीचा याग होता. त्या वेळी ‘यज्ञकुंडातून बाहेर पडणार्या अग्नीच्या ज्वाळा पुष्कळ मोठ्या असून त्यातून सर्वांना चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटले. त्यामुळे सर्व साधकांवर आध्यात्मिक स्तरावर उपाय होत होते.
१ आ. यज्ञात हीना अत्तराची आहुती देणे आणि साधिका सभागृहात बसली असतांनाही तिला अत्तराचा सुगंध येणे : काही वेळाने यज्ञात हीना अत्तराची आहुती देण्यात आली. आम्ही सभागृहात बसलो होतो, तरी तेथेही अत्तराचा सुगंध येत होता. माझ्या शेजारी बसलेल्या एका साधिकेला मी विचारले, ‘‘तुम्हाला सुगंध येतो का ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘हो. मलाही सुगंध येत आहे.’’ तेव्हा मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.
१ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दुर्गादेवीसम दिसणे आणि त्या साधकांना निरांजन असलेली आरती दाखवतांना ‘प्रत्येकाला कृपाशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उभ्या राहून देवीची आरती करत होत्या. तेव्हा मला त्या पुष्कळ उंच दिसत होत्या. मला मान वर करून त्यांचा चेहरा पहावा लागत होता. ‘त्यांच्यात श्री दुर्गादेवी प्रगट झाली आहे’, असे मला वाटले. देवाने मला हे दृश्य दाखवल्याबद्दल मला त्याच्या चरणी कृतज्ञता वाटत होती. ‘दोन्ही देवी सर्वांना निरांजन असलेली आरती दाखवून प्रत्येकाला कृपाशीर्वाद देत आहेत आणि सर्वांवर कृपादृष्टी ठेवून चैतन्य प्रक्षेपित करत आहेत’, असे मला जाणवले.
२. अनुभूती लिहीत असतांना मन एकाग्र होणे आणि ‘घराच्या दाराची घंटा वाजली’, हे लक्षात न येणे
मी दुसर्या दिवशी घरी बसून ही अनुभूती लिहीत होते. त्या वेळी घरात आम्ही (मी आणि माझा मुलगा (श्री. अमेय)) दोघेच होतो. ही अनुभूती लिहितांना माझे मन इतके एकाग्र झाले होते की, ‘दारावरील घंटा वाजली’, हेही माझ्या लक्षात आले नाही. अमेयने दार उघडले. मी ज्या खोलीत बसले होते, तेथे येऊन त्याने मला विचारले, ‘‘दाराची घंटा वाजली, ते तुला समजले नाही का ?’’ तेव्हाच मी भानावर आले. अशी अनुभूती मला पहिल्यांदाच आली होती. एरव्ही माझे मन पुष्कळ चंचल असते.
३. २३.१०.२०२३ या दिवशी झालेल्या यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती
३ अ. वातावरणात मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असणे आणि सर्वांचे ध्यान लागत असणे : २३.१०.२०२३ या दिवशी मला यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. पुरोहित साधक मंत्र म्हणत होते. ते सुरात मंत्र म्हणत असल्याने वातावरण प्रसन्न झाले. वातावरणात मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. सर्वांचे ध्यान लागत होते.
३ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ महालक्ष्मीसम आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सरस्वतीसम दिसणे अन् ‘त्यांच्याकडे सतत पहात रहावे’, असे वाटणे : मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ महालक्ष्मीसम आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सरस्वतीसम दिसत होत्या. त्या वेळी ‘त्यांच्याकडे सतत पहात रहावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मी ‘देवी, मला आपल्यातील चैतन्य ग्रहण करता येऊ दे आणि ते माझ्या हृदयात साठवता येऊ दे’, अशी सतत प्रार्थना करत होते. नंतर श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘आजच्या यज्ञात पुष्कळ चैतन्य आहे आणि पुष्कळ जणांचे ध्यान लागत आहे.’’
‘देवानेच मला या अनुभूती दिल्या आणि माझ्याकडून लिहूनही घेतल्या’, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), फोंडा, गोवा. (२३.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |