सेवाभावी वृत्तीचे आणि स्वतःत जाणीवपूर्वक पालट घडवणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड (वय ५० वर्षे) !

‘माघ शुक्ल दशमी (१९.२.२०२४) या दिवशी श्री. दामोदर गायकवाड यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी, मुलगा आणि भाची यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. दामोदर गायकवाड यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. दामोदर गायकवाड

१. सौ. मनीषा गायकवाड (श्री. दामोदर गायकवाड यांची पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. चिकाटी : ‘माझे यजमान वयाच्या ५० व्या वर्षी चारचाकी चालवायला शिकले. ‘सेवेचा वेळ वाया जाऊ नये’, यासाठी ते सकाळी लवकर ऊठून चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घ्यायला जात असत. त्यांना चारचाकी चालवायला शिकवणार्‍या साधकांप्रती कृतज्ञता वाटते.

१ आ. तत्परता : ते सेवेतील आणि वैयक्तिक जीवनातील प्रत्येक कृती तत्परतेने करतात. ते आधी सर्व सेवा करून नंतर विश्रांती घेतात. ते त्यात कधीच सवलत घेत नाहीत.

१ इ. नामजपादी उपायांप्रती गांभीर्य : ते वैद्यांनी दिलेले उपचार आणि संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय नियमित गांभीर्याने करतात. ते पहाटे ऊठून नामजपादी उपाय करतात.

१ ई. इतरांचा विचार करणे : मला सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय आहे. यजमान स्वतःचे आवरतात आणि नंतर मला उठवतात.

१ उ. जवळीक साधणे : त्यांच्या वागण्यात सहजता आहे. ते प्रतिमेचा विचार न करता कुटुंबात, तसेच आश्रमात वावरतात. त्यांची माझे सर्व नातेवाईक आणि गावकरी यांच्याशी जवळीक आहे.

१ ऊ. सेवाभाव 

१. ते झोकून देऊन सेवा करतात. सेवा करतांना त्यांना ‘सभोवती काय चालले आहे ?’, याचे भान नसते. एकदा ते प.पू. गुरुदेवांच्या खोलीच्या वर असलेला पत्रा स्वच्छ करत होते. ते ही सेवा एकाग्रतेने आणि नामजप करत करत होते. त्या वेळी मी तेथून जात असतांना यजमानांना हाक मारली. तेव्हा त्यांचे माझ्या बोलण्याकडे लक्ष गेले नाही.

२. ते कोणत्याही वेळी सेवा करायला तत्पर असतात. ते रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी लवकर उठून सेवा करतात.

३. ते स्वतःला होणार्‍या शारीरिक त्रासाकडे अधिक लक्ष न देता सेवा करतात. ते स्वच्छतेच्या सेवा करत असल्याने त्यांच्या हाता-पायांना भेगा पडल्या आहेत. ते हाता-पायांना औषध लावून, बूट घालून सेवा करतात. ते ‘शारीरिक त्रास होत आहे’, असा विचार करत नाहीत. त्यांचा ‘गुरु काळजी घेतील. आपण जे आवश्यक आहे, जेवढे जमते, तेवढे करायला हवे’, असा भाव असतो.

४. एकदा साधकांच्या निवासस्थानी पाण्याची टाकी ‘ओव्हरफ्लो’ होऊन पाणी वहात होते. यजमानांना याविषयी रात्री साडेअकरा वाजता समजले. तेव्हा त्यांनी एका साधकाच्या साहाय्याने ते बंद केले. दुसर्‍या दिवशी यजमानांना पहाटे चार वाजता श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेरीत सहभागी व्हायचे होते, तरीही त्यांनी पुढाकार घेऊन सेवा केली.

५. एकदा मला आश्रमात सणानिमित्त सकाळी काही पदार्थ बनवण्यासाठी जायचे होते. त्या वेळी मला बरे नसल्याने मला सकाळी जायला जमणार नव्हते. तेव्हा यजमान मला म्हणाले, ‘‘मी जमेल तेवढा वेळ साहाय्य करतो.’’

६. ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी प्रयत्न करतात.

१ ए. कृतज्ञताभाव : आमच्या हलाखीच्या परिस्थितीत ज्यांनी आम्हाला साहाय्य केले, त्यांची यजमानांनी वेगवेगळ्या पद्धतीने परतफेड केली. ‘देवाने यजमानांच्या मनावर देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्याचा संस्कार केला आहे’, असे वाटते. आमच्या संकटकाळात ज्या व्यक्तींनी आम्हाला साहाय्य केले, त्यांच्याप्रती यजमानांना अजूनही कृतज्ञता वाटते.’

१ ऐ. जाणवलेले पालट

१ ऐ १. इतरांना साहाय्य करणे : मला कधी त्रास होत असल्यास पूर्वी ते मला साहाय्य करत नसत. आता ते मला पुष्कळ साहाय्य करतात.

१ ऐ २. ऐकण्याची वृत्ती : पूर्वी ते लहान-सहान कारणांनिमित्त गावी जात असत. त्यामुळे अनावश्यक व्यय होत असे. वर्ष २०२३ मध्ये त्यांनी दिवाळीनिमित्त घरी जाण्याचे नियोजन केले होते. आम्ही त्यांना आवश्यकता आणि अन्य गोष्टी समजावून सांगितल्यावर त्यांनी आमचे ऐकून गावी जाण्याचे टाळले.

१ ऐ ३. स्वीकारण्याची वृत्ती

अ. पूर्वी त्यांना सेवेत झालेले पालट स्वीकारता येत नसत. त्या वेळी ते साधकांचे स्वभावदोष पहात असत. आता ते सेवेतील पालट सहजतेने स्वीकारतात आणि सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

आ. आम्ही वैयक्तिक गोष्टी करण्याचे ठरवले आणि त्यात काही पालट केल्यास ते सहजतेने स्वीकारतात अन् ‘पुढचे नियोजन कसे करू शकतो ?’, हेही बघतात.

इ. साधकांकडून सेवेत निष्काळजीपणाच्या चुका झाल्यास यजमानांना पूर्वी पुष्कळ प्रतिक्रिया येत असत आणि ते त्या व्यक्त करत असत. आम्ही त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी सेवा योग्य पद्धतीने होण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्यास तुमची साधना होईल.’’ आता ते त्यानुसार प्रयत्न करत आहेत.

१ ऐ ४. राग न्यून होणे : पूर्वी आमची लहान सहान गोष्टींवरून भांडणे होत असत. यजमानांनी राग न येण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आहेत. आता आमच्याकडून काही चुका झाल्यास ते आम्हाला समजून घेतात आणि स्थिर रहाण्याचा प्रयत्न करतात. आता मला त्यांना सहजतेने अडचण सांगता येते. मला त्यांची भीती वाटण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

१ ऐ ५. चुकांप्रती गांभीर्य वाढणे : पूर्वी ते स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी विचारत नसत आणि आम्ही त्यांना सांगितलेल्या चुका स्वीकारत नसत. आता ते चुका विचारतात आणि क्षमाही मागतात. एकदा आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र बसलो होतो. तेव्हा यजमानांनी चुकांविषयी विचारल्यावर मी त्यांना त्यांची चूक सांगितली. तेव्हा त्यांनी लगेच कान पकडून क्षमा मागितली.

१ ऐ ६. पूर्वी ‘आमची असलेली हलाखीची स्थिती आणि काही प्रसंग’ यांमुळे यजमान केवळ त्यांच्या लहान भावाशी चांगले बोलत असत. ते अनेक वर्षे कुटुंबियांशी मनापासून बोलत नव्हते. ते साधनेत आल्यावर ‘आपले प्रारब्ध होते’, असा विचार करून ते सर्व नातेवाइकांशी प्रेमाने बोलतात.’

२. श्री. हृषिकेश गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ. प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्ती : ‘वर्ष २००५ पूर्वी आमच्या घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. बाबा कुटुंबावर असलेले ऋण फेडण्यासाठी नोकरीसाठी गावाहून पुणे येथे आले. त्यांनी वेगवेगळ्या आस्थापनांत नोकरी केली आणि नंतर खानावळ व्यवसाय चालू केला. बाबांच्या प्रामाणिकपणामुळे आणि कष्टाळू वृत्तीमुळे अल्पावधीतच व्यवसाय वाढला. ते स्वतः धान्य निवडणे, कणीक मळणे, पोळ्या भाजणे, भांडी घासणे, अशी सर्व कामे निःसंकोचपणे करत. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून भगवंताने आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली.

२ आ. साधनेची तळमळ : आमची अत्यंत हलाखीची स्थिती असतांना बाबांनी पुष्कळ कष्ट केल्याने आमची आर्थिक स्थिती सुधारली; मात्र बाबांना साधना समजल्यावर अल्पावधीतच त्यांनी सर्व विकून ते आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागले.

२ इ. भाव आणि श्रद्धा : बाबा आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागण्यापूर्वी त्यांना तंबाखू खाण्याचे व्यसन होते. ते आश्रमात आल्यावर लगेचच त्यांनी गुरूंप्रती भाव आणि श्रद्धा यांच्या बळावर स्वतःला व्यसनमुक्त केले. बाबांमध्ये परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे.

‘हे गुरुदेवा, तुम्हीच बाबांमधील ही गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आणून दिली आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिली’, त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’

३. कु. वेदश्री भुकन (श्री. दामोदर यांची भाची, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ११ वर्षे)

अ. ‘दामोदरमामा स्वतःच्या सेवेचा आढावा त्यांच्या उत्तरदायी साधकाला नियमितपणे पाठवतात.

आ. मामा सेवेच्या संदर्भातील सर्व सूत्रे तत्परतेने पूर्ण करतात.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक