अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशाला पराभूत करणार्या व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा !
व्हिएतनामसारख्या लहानशा देशाने अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशाचा पराभव केला होता. जवळजवळ २० वर्षे चालू असणार्या या युद्धात अमेरिका पराभूत झाली होती. या युद्धात व्हिएतनाम कसा जिंकला ? कोणत्या युद्धनीतीच्या आधारे त्यांनी विजय संपादन केला ? याविषयीची माहिती देणारा लेख येथे देत आहोत.
१. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे युद्धनीती सज्ज केल्याने अमेरिकेवर विजय मिळवता येणे
‘व्हिएतनामसारख्या लहानशा देशाने अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशावर विजय मिळाल्यानंतर व्हिएतनामच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना पत्रकारांनी विचारले, ‘‘तुम्ही अमेरिकेला पराभूत कसे करू शकला ? हे युद्ध कसे जिंकले ?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘खरे तर अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशाचा पराभव करणे अशक्य होते; परंतु त्या महाशक्तीशी लढा देण्यासाठी मी एका महान राजाचे चरित्र वाचले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेने मी युद्धनीती सज्ज करून ती लागू केली आणि आम्हाला सहजतेने विजय मिळाला.’’
२. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला गुणगौरव
पुढे पत्रकारांनी विचारले, ‘‘कोण होता तो महान राजा ?’’ या प्रश्नानंतर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या जागेवर उभे राहिले आणि ते आदराने म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज !’’ ते पुढे म्हणाले, ‘‘जर असा राजा आमच्या देशात जन्माला आला असता, तर आज आम्ही सर्व जगावर राज्य केले असते.’’ त्यानंतर काही वर्षांनी व्हिएतनामच्या त्या राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झाला. ‘शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला’, असे वाक्य त्यांनी त्यांच्या समाधीवर लिहिण्यास सांगितले. आजही ते वाक्य आपण त्यांच्या समाधीवर पाहू शकतो.
३. छत्रपती शिवरायांसारखे शूरवीर जन्माला येण्यासाठी रायगडावरील माती घेऊन जाणारे व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री !
काही वर्षांपूर्वी व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौर्यावर आले होते. त्या वेळी राजकीय कार्यक्रमानुसार त्यांना लाल किल्ला आणि म. गांधी यांची समाधी दाखवली गेली; परंतु हे पहातांना त्यांनी विचारले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे ?’’ त्या वेळी भारत सरकारचे तत्कालीन केंद्रीय मंत्री चकित झाले आणि त्या वेळी उपस्थित असलेल्या त्या मंत्र्यांनी उत्तर दिले, ‘‘रायगड.’’
व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री रायगडावर पोचले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलून स्वतःच्या पिशवीत ठेवली. याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘ही माती शूरविरांची आहे. या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान चरित्रवान राजाचा जन्म झाला आहे. माझ्या देशात परत जाऊन ही माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे, ज्यामुळे आमच्या देशात सुद्धा असे शूरवीर जन्म घेतील.’’ (असे भारतातील निधर्मी लोकप्रतिनिधी कधी म्हणतात का ? उलट ‘छत्रपती शिवाजी महाराज निधर्मी होते’, अशी मानसिकता लोकप्रतिनिधींची असते ! – संपादक)
– श्री. सुरेंद्रकुमार गोयल (साभार : मासिक ‘कल्याण’)