समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवराय यांची राजनीती !
१. समर्थ रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवरायांची वर्णिलेली थोरवी !
‘सेतू माधवराव पगडी यांनी ‘समर्थ रामदासस्वामी’ हेच छत्रपती शिवरायांचे मूल्यमापन करणारे समकालीन इतिहासकार असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजीराजांना पाठवलेल्या पत्रात समर्थांनी अवघ्या ५ अक्षरांमध्ये शिवचरित्राचे सार सांगितले आहे. ‘श्रीमान योगी’ अशा शब्दांत समर्थांनी छत्रपती शिवरायांची थोरवी छत्रपती संभाजी महाराज यांना सांगितली.
२. छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासस्वामी यांची राजधर्म अन् क्षात्रधर्म संकल्पना
‘परकीय मोगल आणि इस्लामी सत्तेच्या जोखडातून देश मुक्त व्हावा’, अशी समर्थांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सामर्थ्याची (बळाची) उपासना करणे, हा राजधर्म असल्याचे प्रतिपादन केले. छत्रपती शिवरायांनी राजधर्म आणि क्षात्रधर्म सांगितला. महाराष्ट्र धर्माचीच, म्हणजेच राष्ट्रतेजाची उपासना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. समर्थांनी ‘राजकारण’ हा शब्दच व्यापक अर्थाने मराठी जनतेला पटवून दिला. समर्थांनी स्वधर्माचा प्रसार करतांनाच ‘शक्ती’ हेच राज्याचे प्रमुख सूत्र असल्याचे आवर्जून सांगितले. ‘आधी गाजवावे तडाखे । मग भूमंडळ गाजे ।’, अशी त्यांची बलशाली स्वराज्याची संकल्पना होती. त्यांचा महाराष्ट्र धर्म केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. संपूर्ण देशातच सत्य आणि न्याय यांच्या राज्याची स्थापना व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते.
३. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जाणता राजा’ म्हणून प्रशंसा करणे
छत्रपती शिवरायांचे चरित्र निष्कलंक आणि लखलखीत होते. सामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी, वेदनांशी त्यांची नाळ जोडलेली होती. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही शिवू नये’, हा शिवशाहीचा नियम होता. सर्वसामान्य जनतेचा छळ करणारे, मग ते स्वराज्यातील असोत किंवा दुसर्या सत्तेच्या जोखडाखालचे असोत, त्यांना शासन करतांना छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत. मानवी गुलामगिरीचे जगातून उच्चाटन करणारा हा पहिला राजा होता. ‘जनतेसाठी स्वराज्य आणि स्वराज्यासाठी जनता हे त्यांचे ब्रीद होते’. त्यामुळेच ‘जाणता राजा’ अशा शब्दांत समर्थ त्यांची प्रशंसा करतात.
४. राजाने सतत विवेक बाळगावा. शत्रूला कधीही कमी लेखू नये. प्रजेचे पालन करतांना स्वार्थ आणू नये. सत्तेने माजू नये.
५. समर्थ रामदासस्वामी यांची दूरदृष्टी !
छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर स्वराज्यात संघर्ष निर्माण झाला. औरंगजेब स्वराज्य संपवण्यासाठी प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरणार, याची खात्री समर्थांना होतीच; म्हणूनच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना ‘अखंड सावधान असावे ।’, असा महत्त्वाचा सल्ला दिला.
६. राजकारणातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा करणारे आतापर्यंतचे शासनकर्ते यातून बोध घेतील का ?
छत्रपती शिवराय हे आदर्श राज्यकर्ते, योद्धे आणि क्षात्रधर्माचे पालन करणारे राजे होते. छत्रपती शिवरायांच्या निर्वाणाच्या वेळी स्वराज्य दक्षिणेत तंजावरपर्यंत विस्तारलेले होते. त्या वेळी महाराजांकडे ४०० किल्ले होते. एक कोटीचा खजिना होता. २ लाख सैन्य होते. समर्थांच्या शब्दांत ‘स्वराज्य बळावलेले’ होते; परंतु छत्रपती शिवरायांची खासगी मालमत्ता आणि संपत्ती नव्हती.
७. लोकशाहीतील निधर्मी तत्त्वामुळे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना दुर्दैवाने पडलेला विसर !
छत्रपती शिवराय राजनीतीज्ञ होते. त्यांनी समर्थांची राजनीती कृतीशीलपणे कार्यवाहीत आणलेली होती. छत्रपती संभाजीराजांनी तो वारसा पुढे चालवला. प्रजेला स्वतःचे मानून औरंगजेबाने केलेल्या छळाचा अपार धैर्याने सामना केला. त्यांनी मृत्यूशी झुंजच दिली. छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतरही मराठ्यांनी युद्ध चालू ठेवले. औरंगजेबाशी मराठ्यांनी ३० वर्षे दिलेला लढा हे प्रजेने संघटितपणे लढलेले ‘स्वातंत्र्यसमर’ होय. औरंगजेबाला शेवटपर्यंत स्वराज्य संपवता आले नाही. तो हताश आणि निराश स्थितीतच गेला. मराठी मुलुखातच त्याची कबर आहे. हाच समर्थांच्या राजनीतीचा विजय होता.’
– सौ. वैजयंती कुलकर्णी
(साभार : मासिक ‘समर्थांची राजनीती !’)