केंद्र आणि राज्य सरकार यांची कामे ‘शिवदूत’ बनून जनतेपर्यंत पोचवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
कोल्हापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला लोकसभेसाठी ४०० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे ध्येय दिले असून महाराष्ट्रात आपल्याला ४५ हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत. केंद्र सरकारने १० वर्षांत पुष्कळ प्रमाणात कामे केली असून राज्य सरकारनेही गेल्या दीड वर्षात सामान्य जनतेची कामे केली आहेत. येणार्या काळात केंद्र आणि राज्य सरकार यांची कामे ‘शिवदूत’ बनून पोचवा, मुंबईत मला येऊन भेटण्यापेक्षा सामान्य जनतेची कामे करा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘महासैनिक दरबार हॉल’ येथे शिवसेनेच्या दोन दिवसांच्या मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार भरतशेठ गोगावले, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांसह राज्यभरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,
१. आपले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे, कष्टकरी लोकांचे, तरुणांचे, वारकर्यांचे-धारकर्यांचे सरकार आहे. मी ‘सी.एम्.’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ आहे. मी परदेशात जाऊन ३ लाख ७३ सहस्र कोटी रुपयांचे करार केले आणि त्यानंतर माझ्या शेतात येऊन शेतीही केली. मी शेतकरी असून शेतीशी नाळ असणारा कार्यकर्ता आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे.
२. या अगोदरच्या सरकारने कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. मी ‘फेसबुक लाईव्ह’वर काम करणारा कार्यकर्ता नसून मी ‘फेस टू फेस’ काम करणारा मुख्यमंत्री आहे. जनतेशी आपली नाळ तुटणार नाही, हे कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन !
मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी आम्ही २० फेब्रुवारीला मुंबई येथे विशेष अधिवेशन बोलावले आहे. ‘मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार, हा माझा शब्द आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच आहोत’, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.