संत बाळूमामा देवस्थानाचे मंदिर सरकारीकरण करू नये !
|
वर्धा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानात ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा करावी; मात्र या प्रकरणाचे निमित्त करून मंदिराचे सरकारीकरण करू नये, तसेच अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यानंतर देशभरात कट्टरतावादी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे करण्यात येणे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, देशविरोधी भावना निर्माण करणे आदी अवैध गंभीर कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे अशा समाजकंटकांवर तत्परतेने कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश रवताळे यांनी स्वीकारले. या वेळी रामदेगी देवस्थानाचे अध्यक्ष श्री. हनुमंत कारेकर (जिल्हा चंद्रपूर), हिंदु जनजागृती समितीचे अनुप चौधरी, शशिकांत पाध्ये, पुरुषोत्तम हरणे, सौ. विजया भोळे, सौ. वनिता किरसान आदी उपस्थित होते.
यापूर्वी राज्यात सरकारीकरण झालेल्या श्री विठ्ठल मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचे श्री साई संस्थान यांसह राज्यातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे आणि येथील सरकारी समित्यांमध्ये भूमी, दागिने अन् अन्य अनेक गोष्टींमध्ये कोट्यवधींचे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. जे सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करतात, त्यांच्याकडे मंदिरांची व्यवस्था देणे म्हणजे ‘चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्या’सारखे आहे. त्यामुळे मंदिराच्या सरकारीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. संत बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण न करता माजी विश्वस्त दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या कह्यात हे देवस्थान द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.