शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – गिरीश महाजन, पर्यटनमंत्री

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४

पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई – पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात म्हणजे शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. ३ दिवस होणार्‍या या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची संस्कृती आणि समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणार्‍या जुन्नर शहरात ३ दिवस कला, संगीत, साहस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, ‘क्वाड बायकिंग’ (रस्त्याच्या बाहेर चालवली जाणारी ४ चाकांची बाईक), पेंटबॉल (नेमबाजी), तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग (दोर पकडून वर चढणे), झिपलायनिंग (केबलला धरून जाणे), स्पीड बोटिंग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्री मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंगे, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि ‘स्टारगेझिंग’चा आनंद अनुभवता येणार आहे. हडसर गड, निमगिरी – हनुमंतगड, नाणेघाटासमवेत जीवधनगड, कुकडेश्वर मंदिरासमवेत चावंडगड येथे २ दिवसांच्या गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे. कँपिंगसमवेत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि ‘हडसर – निमगिरी – हनुमंतगड – नाणेघाट – जीवधन येथे गिर्यारोहण’, हा उपक्रमही आयोजित केला आहे.