भरतपूर (राजस्थान) येथे २० सहस्र हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवले !

  • धर्मांतरामागे इटलीची संघटना !

  • राजस्थानच्या अनेक गावांमध्ये धर्मांतराची केंद्रे कार्यरत !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

भरतपूर (राजस्थान) – राज्यात सत्संगाच्या नावाखाली हिंदूंना पैसे आणि शिधा देण्याचे आमीष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या धर्मांतराच्या मागे इटलीच्या एका संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. राजस्थानच्या अनेक गावांमध्ये धर्मांतराची केंद्रे कार्यरत आहेत. भरतपूरमध्ये तब्बल २० सहस्र हिंदूंचे धर्मांतर झाल्याची माहितीही समोर आली आहे.

धर्मांतराची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना !

धर्मांतरासाठी प्रार्थनासभांचे आयोजन केले जात होते. या प्रार्थनासभांना येणार्‍या हिंदूंना शिधा देण्यात येत होते. ‘आजार बरे होतील’, असे आश्‍वासन दिले जात होते. गरजू हिंदूंचे आर्थिक प्रश्‍नही सोडवले जात होते. गरिबांच्या बँक खात्यांवर लाखो रुपयांचे साहाय्य पाठवण्याचे आमीष दाखवले जात होते. लहान प्रार्थनासभांपासून चालू करून हा खेळ मोठमोठ्या फार्म हाऊस, रिसॉर्ट्स, हॉटेल्स येथपर्यंत पोचला होता. येथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात होते. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे अन्वेषण चालू करण्यात आले आहे. यासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

धर्मांतरासाठी २ लाख ते ५ लाख रुपयांचे आमीष !

स्थानिक लोकांनी सांगितले की, हिंदूंना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी २ लाख ते ५ लाख रुपये दिले जातात. माजी सरपंच तुहीराम यांनी सांगितले की, त्यांनी धर्मांतराच्या कृत्यांत गुंतलेल्यांना यापूर्वीही ताकीद दिली होती; मात्र त्यांनी ते मान्य केले नाही.

धर्मांतराचे ‘इटली कनेक्शन’ !

भरतपूरमध्ये चालू असलेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या खेळात ‘लभाना मिनिस्ट्री’चे नाव पुढे आले आहे. ‘लभाना मिनिस्ट्री’ ही इटलीची संस्था आहे. ते ख्रिस्त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. भरतपूरच्या पिपळा, कांजोली, गुंडवा, बाढेरा, नोह बहामडी, बहनेरा, रुपवास, गघीना, बायणा आदी ठिकाणी ख्रिस्ती धर्मांतराची केंद्रे चालू आहेत.

पास्टर बजिंदर सिंह मुख्य आरोपी !

(पास्टर म्हणजे धर्मप्रचारक)

भरतपूर येथील एका हॉटेलमध्ये ११ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा मोठा डाव हाणून पाडला. त्या कार्यक्रमात ३५० ते ५०० लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पास्टर बजिंदर सिंह चंडीगडहून थेट जोडला गेला होता. हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात होते. या कार्यक्रमाचे आयोजक कुंवर सिंह आणि शैलेंद्र सिंह यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी एकट्या भरतपूरमध्ये २० सहस्रांहून अधिक लोकांचे धर्मांतर केले आहे.

संपादकीय भूमिका

  • इटलीच्या संघटनेचा धर्मांतराच्या या प्रकारामागे हात असल्याने हे काँग्रेसचेच कारस्थान आहे, किंबहुना राज्यातील याआधीच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात या संघटनेला मोकळे रानच होते, असा आरोप कुणी केल्यास चूक ते काय ?
  • राजस्थानमध्ये आता भाजपचे शासन असल्याने त्याने लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा आणला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !