अखिल भाविक वारकरी मंडळाकडून पंढरपूर येथे सोमवारी ठिय्या आणि भजन आंदोलन ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

सोलापूर – पंढरपूर येथील ६५ एकर परिसरात वारकर्‍यांना जागावाटप होणार असल्याने दिंडीप्रमुखांना १४ फेब्रुवारी या दिवशी आवेदन भरून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे सर्व दिंडीप्रमुख हे त्यांची पालखी आणि दिंडी सोडून पंढरपूर येथे आले. तेथे आल्यावर प्रत्यक्षात कसलीच सिद्धता नव्हती, अगदी साधे पटलही नव्हते. यानंतर १५ फेब्रुवारी या दिवशी जागावाटप केले जाईल, असे सांगण्यात आले; मात्र प्रशासनाकडून कसलीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे वारकर्‍यांना होणार्‍या या असुविधेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी पंढरपूर येथे ६५ एकर जागेसमोर सकाळी ९.३० वाजता ठिय्या आणि भजन आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे.

अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्‍यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्‍या वारीसाठी सहन करावा लागत आहे. यामुळे तेथील अधिकारी हे हिंदुविरोधी आहेत, असा संशय आम्हाला येत आहे. वारकरी हे संस्कृती, परंपरा सांभाळण्यासाठी दिंडी काढतात. त्यामुळे होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.