आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपाचे उपाय करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच कर्ते-करविते आहेत’, याची जाणीव होऊन अहं न वाढणे
‘ऑगस्ट २०११ मध्ये मी रामनाथी आश्रमात असतांना प.पू. डॉक्टरांनी मला निरोप पाठवून आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करण्यास सांगितले होते. त्या माध्यमातून ‘त्यांनी माझे अहं निर्मूलन कसे केले ?’, याविषयी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. (भाग ८)
१. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमोर आसंदीत बसून नामजप करण्यास सांगणे
मला सांगण्यात आले, ‘तुम्ही सभागृहात सर्वांसमोर असलेल्या आसंदीवर बसा. तुमच्यासमोर आध्यात्मिक त्रास असलेले काही साधक असतील. ‘त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून कुठला नामजप करायला हवा ?’, ते देवाला प्रार्थना करून विचारा. जो नामजप मिळेल, तो तुम्ही करावा.’ माझ्यासाठी ही सेवा नवीनच होती.
२. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना जाणवलेली सूत्रे
२ अ. नामजपाला आरंभ केल्यावर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना होणारा त्रास वाढणे : मी सभागृहात जायच्या आधीपासून तिथे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले काही साधक बसले होते. मी माझ्यासाठी ठेवलेल्या आसंदीवर जाऊन बसलो आणि देवाला प्रार्थना करून आलेला नामजप डोळे मिटून शांतपणे करायला आरंभ केला. नामजपाला आरंभ केल्यावर साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास वाढला.
२ आ. साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना ध्यान लागून कशाचीच जाणीव न रहाणे : नामजपादी उपाय चालू झाल्यावर आध्यात्मिक त्रास असलेले साधकांचा त्रास वाढला होता; पण त्याही स्थितीत माझे मन पूर्णपणे एकाग्र होऊन ‘माझे कधी ध्यान लागायचे’, ते मला कळायचे नाही. मला केवळ अस्पष्टपणे ‘आजूबाजूला काहीतरी चालू आहे’, असे काही वेळा जाणवायचे; पण त्याविषयी माझ्या मनात कसलीही संवेदना उमटत नसे. माझ्या शरिराची कसलीही हालचाल होत नसे. तेव्हा ‘माझे शरीर आसंदीला चिकटले आहे’, असे मला वाटायचे. मला वेळेचे भान किंवा देहाची जाणीवही रहात नसे. नामजपादी उपाय संपल्यावर कुणीतरी मला हात लावून उठवत असे, तेव्हा मला जाणीव व्हायची. तोपर्यंत २ – ३ घंटे होऊन गेलेले असायचे. या नामजपादी उपायांनी साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून झालेला असायचा.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींवर पूर्ण नियंत्रण आहे’, हे लक्षात येणे
एकदा असेच आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे सत्र चालू होते. साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास वाढला होता. त्यामुळे ‘आता काय करावे ?’, हे विचारण्यासाठी सौ. गाडगीळकाकू (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेल्या. तेव्हा प.पू. गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘त्यांना (वाईट शक्तींना) सांगा, ‘आता पुरे झाले, शांत व्हा.’’ प.पू. गुरुदेवांचा हा निरोप घेऊन सौ. गाडगीळकाकू सभागृहात येईपर्यंत सर्वांचा आध्यात्मिक त्रास न्यून झाला होता. याचा अर्थ ‘ज्या क्षणी प.पू. डॉक्टरांनी ‘शांत व्हा’, असे सांगितले, त्याच क्षणी सर्वांचा त्रास न्यून झाला होता. यातून ‘वाईट शक्तींवर प.पू. गुरुदेवांचे पूर्ण नियंत्रण आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे साधनेत वाईट शक्तींच्या होणार्या विरोधाविषयी वाटणारे भय न्यून झाले.
प.पू. डॉक्टरांनी लिहिलेल्या ‘शक्ती स्तवना’त आदिशक्तीची स्तुती करतांना एक ओळ अशी आहे, ‘विविध प्रकारे तूच प्रकटशी । सुर-असुरांतील शक्ती तूची ।।’, या ओळीची ही अनुभूती होती.
४. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. गुरुदेवांनी मला आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमोर नामजप करत बसायला सांगितले, तेव्हा त्यांच्या संकल्पाने माझे सहज ध्यान लागले. एरव्ही मला ध्यान लावायला अवघड जाते.
आ. आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या वेळी साधकांना त्रास देणार्या सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्ती आणि साधकांसाठी नामजपादी उपाय करणारे संत यांच्यात सूक्ष्मातून युद्ध होते. या युद्धात वाईट शक्तींची शक्ती पुष्कळ प्रमाणात व्यय होते; पण मला अशी कसलीही जाणीव होत नव्हती; मात्र तरीही साधकांचे त्रास न्यून झाले होते.
इ. यातून ‘मला निमित्त करून प.पू. डॉक्टरच वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत होते आणि त्यामुळे वाईट शक्ती पराभूत होत होत्या. यातून ‘कर्ते-करविते प.पू. डॉक्टरच आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
ई. त्यामुळे ‘साधकांचे आध्यात्मिक त्रास माझ्यामुळे न्यून झाले’, असा अहंचा विचार किती अयोग्य आहे ?’, हेही माझ्या लक्षात आले. याचा मला अहं न्यून होण्यासाठी पुष्कळ लाभ झाला.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्याच चरणी अर्पण !’ (क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.८.२०२३)
|