Goa ADHAR To NEPALIS : रुमडामळ, दवर्ली (गोवा) येथे नेपाळी नागरिकांना पैसे घेऊन ‘आधारकार्ड’ दिले जात असल्याचा आरोप
स्थानिक नगरसेवकाची अन्वेषणाची मागणी
मडगाव, १६ फेब्रुवारी (वार्ता.) : बांगलादेशी घुसखोरांना गोव्याच्या पारपत्र विभागाने विदेशात जाण्यासाठी पारपत्र दिल्याची माहिती उघडकीस आलेली असतांनाच आता भारतात घुसलेल्या नेपाळी नागरिकांनाही बनावट रहिवासी दाखल्याच्या आधारे ‘आधारकार्ड’ देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हाऊसिंग बोर्ड, रुमडामळ, दवर्ली येथे बनावट रहिवासी दाखल्याच्या आधारे ३ सहस्र ५०० ते ४ सहस्र रुपये आकारून नेपाळी नागरिकांना ‘आधारकार्ड’ देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
या प्रकरणी एक चलचित्र सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी ‘पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे. याविषयी मायणा-कुडतरी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे; मात्र त्यांच्या हाती अजूनही धागेदोरे लागलेले नाहीत.
Aadhaar card is being given to Nepalis in Goa? Watch this video.
(VC: Goan Varta)#Goa pic.twitter.com/Vu6jrOuiQm— The Goan 🇮🇳 (@thegoanonline) February 16, 2024
मडगाव नगरपालिकेच्या मागच्या बाजूला असलेल्या एका इमारतीत नियोजन आणि सांख्यिकी खात्याकडून ‘आधारकार्ड’ दिले जाते. यासाठी या ठिकाणी एका व्यक्तीची नियुक्तीही करण्यात आली आहे. संबंधित चलचित्रामध्ये ‘३ सहस्र ५०० ते ४ सहस्र रुपये आकारून नेपाळी नागरिकांना ‘आधारकार्ड’ दिले जात आहे’, अशी माहिती नेपाळ नागरिक स्वत:च देत असल्याचे दिसत आहे. याविषयी मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण गावस देसाई म्हणाले, ‘‘ज्या ‘आधारकार्ड ऑपरेटर’ महिलेच्या विरोधात हा आरोप होत आहे, त्या महिलेला १६ फेब्रुवारी या दिवशी पोलीस ठाण्यात बोलावून अन्वेषण केले आहे. संबंधित महिला ‘ऑपरेटर’ला सांख्यिकी खात्यानेच नेमले आहे. महिला ‘ऑपरेटर’च्या मते आधारकार्ड ‘बारकोड ‘स्कॅन’ करून सिद्ध केले जाते. यामुळे बनावट दाखले घेऊन आल्यास आधारकार्डच्या ‘सिस्टम’प्रमाणे कुठलीही माहिती पूर्वी सांख्यिकी खात्याच्या ‘पोर्टल’वर नोंद झालेली नसल्यास आणि दिलेली माहिती जुळत नसल्यास ‘आधारकार्ड’ सिद्ध होऊ शकत नाही.’’