परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा यांतील आनंद अनुभवणार्‍या रामनाथी (फोंडा, गोवा) येथील सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे) यांनी उलगडलेला स्वतःचा साधनाप्रवास !

१६.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सौ. नंदिनी उल्हास पोकळे यांच्या साधनाप्रवासाच्या अतंर्गत त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात केलेली अध्यात्मप्रसाराची सेवा, सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि गोवा येथे स्थलांतर झाल्यावर रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येऊन साधना करणे’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.    

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/765155.html

सौ. नंदिनी पोकळे

१६. संस्कृत श्लोकांचे लिखाण आणि पठण करणे

१६ अ. प.पू. गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेले श्रीमद्भवद्गीतेतील ५ श्लोक पाठ करून ते प्रतिदिन म्हणणे : ‘वर्ष २०११ – २०१२ मध्ये प.पू. गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्रीमद्भवद्गीतेतील पुढील ५ श्लोक देऊन त्यांवर त्यांचे विचार मांडले होते. त्यानंतर मी अत्यंत गांभीर्याने ते पाच श्लोक पाठ केले. ते ५ श्लोक मी अजूनही म्हणत आहे.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२

अर्थ : जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्‍या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक १०

अर्थ : नेहमी माझे ध्यान इत्यादींमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणार्‍या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो. त्यामुळे ते मलाच प्राप्त होतात.

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १२, श्लोक ७

अर्थ : हे पार्था (पृथापुत्र अर्जुना), माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो.

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ६५

अर्थ : तू माझ्या ठिकाणी मन ठेव. माझा भक्त हो. माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे सत्य मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो; कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ६६

अर्थ : सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तीमान आणि सर्वाधार अशा मला, म्हणजे परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस.

श्री. उल्हास पोकळे

१६ आ. स्तोत्रे आणि श्लोक अन् त्यांचे अर्थ वहीत लिहून काढणे आणि त्यांचे पठण करणे : राधाकृष्णाच्या कृपेने मला स्तोत्रे आणि श्लोक एका वहीत लिहिण्याची प्रेरणा झाली. त्यानंतर अष्टदेवता आणि सरस्वतीदेवी यांचे स्मरण करून मी देवतांची स्तोत्रे, कवच, गणपति अथर्वशीर्ष इत्यादी सर्व एका वहीत लिहिले, तसेच ‘प्रातःस्मरण, नित्य पठणाचे श्लोक, देवीचे श्लोक’, या श्लोकांचे अर्थ लिहिले. मी सनातन संस्थेच्या ‘ॐ चैतन्यवाणी’ या ‘ॲप’वरील स्तोत्रे, नामजप, श्लोक आणि आरत्या यांचे नियमित पठण केले.

मी संस्कृत श्लोकांविषयी ज्ञान प्राप्त करण्यास आरंभ केला. त्यासाठी मी माहितीजाल (इंटरनेट) आणि भ्रमणभाष यांचा वापर केला. मी अनेक ग्रंथ वाचले. यातून मला वेगळेच समाधान मिळत होते. माझ्या मुलाने माहितीजालावर विकल्या जाणार्‍या जुन्या ग्रंथांची सूची बनवून मला पाठवली. मी त्यांतील सर्व श्लोक आणि त्यांचे अर्थ लिहिले.

जुलै २०२३ मध्ये गुरुपौर्णिमेच्या १० दिवस आधी गुरुदेवांनी ही वही माझ्याकडून पूर्ण करून घेतली. मी तिचे नियमित वाचनही करते.

१६ इ. ‘संस्कृत श्लोक लिहिणे आणि त्यांचे पठण करणे’, यांमुळे झालेले लाभ

१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असल्याने ती श्रेष्ठ आहे. मला संस्कृत श्लोकांचे अर्थ लिहितांना आनंद मिळतो; कारण ‘आपण देवाचे कार्य करतो’, असे मला वाटते.

२. ‘मी देवाचे कार्य करत असल्याने माझ्या भोवती संरक्षककवच निर्माण होते’, असे मला जाणवते.

३. आरंभी माझे हस्ताक्षर चांगले नव्हते; परंतु लिहिता लिहिता माझे अक्षर चांगले झाले आणि मला सहज लिहिता येऊ लागले.

४. गुरुकृपेने मला विषयांचे जलद आकलन होऊ लागले.

५. माझ्यातील ‘आळस, विसरणे, भीती’, यांसारखे स्वभावदोष न्यून झाल्याचे मला जाणवते.

१६ ई. संस्कृत श्लोकांचे सामूहिक पठण केल्याने होणारे लाभ

१. श्लोकांच्या सामूहिक पठणाने आपली सात्त्विकता पुष्कळ वाढते. आपले समष्टी कार्य निविघ्नपणे होऊन समष्टीला बळ मिळते.

२. सामूहिक पठण केल्याने ईश्वरी शक्ती जागृत होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो.

१७. श्लोक लिहिलेल्या वहीबद्दल प.पू. गुरुदेवांनी साधिकेचे कौतुक करणे आणि तेव्हा ‘जीवनाचे सार्थक झाले’, असे साधिकेला वाटणे

एकदा आम्हाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्या वेळी आम्हाला प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाचा लाभ झाला. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी त्या वहीबद्दल माझे कौतुक केले. हा माझ्यासाठी पुष्कळ आनंदाचा क्षण होता. त्या वेळी ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले.

आता गुरुदेवांनी माझ्याकडून लिहून घेतलेल्या पंचवीसहून अधिक वह्या झाल्या आहेत. हीच माझ्याकडून गुरुदेवांना मानवंदना आहे.

१८. घरी धार्मिक ग्रंथांचा संग्रह करणे

आम्ही पुराणे विकत घेतली. ही पुराणे पुष्कळ महत्त्वाची आहेत; कारण ‘हिंदु राष्ट्रात या पुराणांचा आपल्याला पुष्कळ लाभ होणार आहे’, असे मला वाटते. आम्ही ‘ब्रह्मपुराण, विष्णुपुराण, मत्स्यपुराण, कूर्मपुराण, वामनपुराण, नरसिंहपुराण, भागवतपुराण, देवीपुराण, वराहपुराण, शिवपुराण, वाल्मीकि रामायण, दत्तपुराण, गुरुचरित्र’, अशा अनेक ग्रंथांचा संग्रह केला.

मी राधाकृष्णाच्या मंदिरात भावपूर्ण प्रार्थना केली, ‘देवा राधाकृष्णा, प.पू. गुरुदेव आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आमच्या घरी येऊन गेले. सहस्रो जन्म घेतले, तरी असे गुरुदेव भेटणार नाहीत. ‘याच जन्मात मला गुरुदेवांचे चरण प्राप्त व्हावेत’, अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे), रामनाथी, फोंडा, गोवा. (२५.९.२०२३)
(समाप्त)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक