आध्यात्मिक त्रासांवर मात करून सर्वांवर प्रेम करणार्या गडहिंग्लज येथील सौ. शामला संजीव चव्हाण (वय ५० वर्षे) !
गडहिंग्लज येथील सौ. शामला संजीव चव्हाण (वय ५० वर्षे) यांची त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. कुटुंबीय
१ अ. श्री. संजीव चव्हाण (पती)
१ अ १. प्रेमभाव
अ. ‘वर्ष १९९८ ते २००३ या वर्षी कोकणातून जिल्ह्यात प्रसारासाठी साधक आले होते. त्यांचा स्वयंपाक आणि इतर सर्व सेवा शामला प्रेमाने न थकता करत होती.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पूर्वी एकदा जाहीर सभा होती. तेव्हा मी चेन्नईला होतो. त्या वेळी ३०० हून अधिक साधक प्रसाराला आले होते. तेव्हा बहुतेक साधक आमच्या घरी रहायला होते. त्या सर्वांची सौ. शामला काळजी घेत होती. एवढ्या लहान वयात तिने दायित्व घेऊन सेवा करणे तिला केवळ गुरुदेवांच्या कृपेने शक्य झाले.
इ. साधकांना कोणतीही गोष्ट अल्प पडू नये, यासाठी ती पुढाकार घेऊन करत होती. तिच्यातील प्रेमभावामुळे पूर्वीचे साधक कधी भेटले, तर तिची आवर्जून आठवण काढतात आणि ‘तिचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे’, याचा उल्लेख करतात.
ई. प्रेमभाव, त्याग आणि देवावरील श्रद्धा यांमुळे तिने कसलीही काळजी केली नाही.
१ अ २. प्रत्येक गोष्ट साधनेचा दृष्टीकोन ठेवून पहाणे : मागे ती पुष्कळ आजारी होती, तरी तिने मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाण्यास अनुमती दिली होती. तिच्यामुळे मला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. ती प्रत्येक कृती साधनेचा दृष्टीकोन ठेवून करते. त्यामुळे ‘चांगला साधक कसा असावा ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळते.’
१ आ. श्री. दिग्विजय चव्हाण (धाकटा मुलगा)
१ आ १. ‘माझ्या समवेत श्रीकृष्ण असल्याने तुम्ही माझी काळजी करू नका. माझी काळजी घेणारा तो आहे’, असे आईने सांगणे आणि तिच्या भावामुळे घराचा आश्रम बनणे : ‘मी मुंबईला, माझी मोठी बहीण आणि वडील गेली बरीच वर्षे बाहेर आहेत आणि आई घरी एकटीच असते, तरी तिला भीती वाटत नाही. तिला प्रतिदिन संपर्क केल्यावर ‘माझ्या समवेत श्रीकृष्ण आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. माझी काळजी घेणारा तो आहे’, असे ती आम्हाला सांगते. तिच्यातील भावामुळे घराचा आश्रम झाला आहे. त्यामुळे घरात गेल्यावर पुष्कळ शांत वाटते. आमच्या घरी कोणीही आल्यावर ‘इथे पुष्कळ शांत वाटते’, असे ते म्हणतात.
१ आ २. प्रसारातील साधक घरी आल्यावर त्याचा नामजप आपोआप चालू होऊन ध्यान लागणे : प्रसारातील साधक नेहमी घरी येत असतात. त्यापैकी एका साधकाचा नामजप बरेच दिवस होत नव्हता; पण तो आमच्या घरी आल्यावर त्याचा नामजप आपोआप चालू झाला आणि त्याचे ध्यान लागले.
१ आ ३. आमच्या घरी कोणतेही पाहुणे आले, तर ते इतरांना दूरभाष करतांना सांगतात, ‘आम्ही आज आश्रमात रहायला आलो आहोत.’
१ आ ४. शेजारच्या आजींनी घरी येऊन तुपाचा दिवा लावणे आणि त्यांनी ‘इथे श्रीकृष्ण भेटतो’, असे सांगणे : आमच्या शेजारी एक आजी रहातात. त्यांच्यात चालण्याची शक्ती नाही, तरी त्या आमच्या घरी येतात आणि देवघरात जाऊन तुपाचा दिवा लावतांना म्हणतात, ‘‘मला इथे श्रीकृष्ण भेटतो.’’ त्यांना त्यांच्या मुली भेटायला येतात. त्यांनाही त्या आवर्जून घरी घेऊन येतात आणि देवघरातील श्रीकृष्णाला नमस्कार करायला सांगतात.
१ आ ५. भाव
१ आ ५ अ. गुरूंची सेवा म्हणून करत असल्याने त्यासाठी देवच शक्ती देत आहे’, असे आईने सांगणे : आमची आजी (आईची आई) मरणासन्न अवस्थेत होती. आईला तिचे सर्व करावे लागत होते. आजीला भेटायला येणार्या पाहुण्यांचेही आदरातिथ्य आई न थकता आनंदाने करत होती. तिला विचारल्यावर म्हणायची, ‘‘मी गुरूंची सेवा म्हणून करते आणि त्यासाठी देवच मला शक्ती देत आहे.’’
१ आ ५ आ. प्रेमभाव : आईच्या प्रेमभावामुळे गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण तिला ओळखतात. ती सर्वांची आपुलकीने चौकशी करते. ती घरी आलेल्याला खाऊ दिल्याविना जाऊ देत नाही. आई शिस्तही चांगली लावते. त्यामुळे बर्याच मुलांना तिच्याकडे रहायला आवडते.
१ आ ६. आध्यात्मिक त्रासाशी सतत लढणे : आई स्वतःला होत असलेल्या त्रासाला घाबरत नाही, तर ‘प्रारब्धाचे भोग आहेत’, असे म्हणून त्याला आनंदाने सामोरे जाते. आध्यात्मिक त्रास होत असतांना सतत लढत असते. ‘आपल्या समवेत एवढे मोठे गुरु असतांना आपण का घाबरायचे ?’, असा तिचा विचार असतो.
१ आ ७. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना साधना सांगणे : तिचे एक मोठे शस्त्रकर्म ज्या रुग्णालयात झाले तेथील आधुनिक वैद्यांना तिने साधना सांगितली आणि त्यांना साधक बनवले. ते आधुनिक वैद्यही इतर रुग्णांना तिच्या खोलीत भेट द्यायला सांगतात आणि ‘त्यांच्याकडून तुम्हाला योग्य दृष्टीकोन मिळेल’, असे सांगतात. तिला त्रास होत असला, तरी ती आनंदी असते.
१ आ ८. ती सहसाधकांना आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन त्यांना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करते.
१ आ ९. तिच्या समवेत बोलल्यावर साधना करण्यास प्रेरणा मिळणे : दृष्टीकोन देण्याची तिची पद्धत एकदम सोपी आहे. त्यामुळे ते आकलन व्हायला सोपे जाते. तिच्याशी बोलले की, साधना करण्यास प्रेरणा मिळते. ‘ती भावाच्या स्तरावर कसे प्रयत्न करायचे’, हे सांगते.
१ आ १०. कोणतीही अपेक्षा नसणे : ती सेवा करते, त्या वेळी तिला तहान-भूकेची जाणीव नसते. ‘मी आणखी काय करू ?’, असा तिचा भाव असतो. ती निरपेक्ष राहून सेवा करत असते. त्यामुळे ‘भोळाभाव कसा असावा’, हे तिच्याकडून शिकायला मिळाले.
‘देवा, माझ्याकडून ही सूत्र लिहून घेतली आणि मला अशा आईच्या पोटी जन्म दिलास, त्याविषयी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
२. सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. सौ. लतिका साबळे, गडहिंग्लज, कोल्हापूर.
१. त्यांना अचानक आध्यात्मिक त्रास चालू होतात, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्या सर्वकाही सहन करतात आणि आपली व्यष्टी साधना पूर्ण करतात.
२ आ. सौ. रंजना पाटील, गडहिंग्लज, कोल्हापूर.
अ. ‘सौ. चव्हाणवहिनी पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यांना ‘एखादी सेवा चांगली झाली’, असे सांगितल्यावर ‘प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने झाली’, असा त्यांचा भाव असतो.
आ. साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी चांगली बसावी, यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करतात.’
सौ. शामला चव्हाण यांना आलेल्या अनुभूती
१. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री अचानक डावा डोळा आणि गाल सुजणे, गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना अन् उपाय केल्यावर त्रास न्यून होणे : ‘४.७.२०२० या दिवशी रात्री अचानक माझा डावा डोळा आणि गाल सुजला. मी आध्यात्मिक उपाय केले आणि गुरुदेवांना शरण जाऊन ‘देवा, उद्या गुरुपौर्णिमा आहे, तरी या आध्यात्मिक त्रासांतून मला सोडव’, अशी प्रार्थना करून मी झोपले.
२. सकाळपासून अंगाला खाज येणे आणि त्यावर उपाय केल्यावर त्रास उणावणे : ५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. मला पहाटे ४.३० वाजता आपोआप जाग आली आणि मी आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय पूर्ण करून घेतले. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचा लाभ घेता आला. त्या वेळी मला आध्यात्मिक त्रासही होत होता. सकाळपासून माझ्या अंगाला खाज येत होती. त्यावर उपाय केल्यावर माझा त्रास उणावला.’
|