हिंगोली येथे मराठा आंदोलनाच्या वेळी तरुणांनी बस पेटवली !

  • शिरड शहापूरजवळ २ बसवर दगडफेक

  • जिल्ह्यात २५ ठिकाणी रस्ता बंद आंदोलन !

हिंगोली – जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १६ फेब्रुवारी या दिवशी ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी येथे अज्ञात तरुणांनी बस पेटवून दिल्याने वसमत आगाराची अनुमाने ४० लाख रुपयांची हानी झाली आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. हिंगोली ते परभणी, जिंतूर, वसमत ते नांदेड आणि परभणी, हिंगोली ते नांदेड या मार्गांवर ठिकठिकाणी गावकर्‍यांनी आंदोलन केले. सकाळी ११.३० वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी बस पेटवली. अग्नीशमनदलाच्या प्रयत्नानंतर २ घंट्यांनी आग आटोक्यात आली. तोपर्यंत बसमधील सर्व आसने जळून खाक झाली होती. शिरड शहापूरजवळ २ बसवर दगडफेक झाली.

१. या आंदोलनामुळे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांतून बसगाड्या सोडण्यात आल्या नाहीत, तर ग्रामीण भागातूनही प्रवासी शहराकडे आलेच नाहीत. त्यामुळे बसस्थानकांवर शुकशुकाट होता.

२. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात बाहेरगावांहून येणार्‍या कर्मचार्‍यांची मोठी अडचण झाली. वसमत ते परभणी मार्गावर खांडेगाव पाटीजवळ ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

३. या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनापासून काही अंतरावर वाहने थांबवण्यात आली होती.

४. सकाळी ८.१५ वाजता वसमत आगाराची वसमत ते पुणे ही बस मार्गस्थ झाली होती; मात्र खांडेगाव पाटीपासून काही अंतरावरच बस थांबवण्यात आल्याने त्यातील सर्व प्रवासी उतरून गेले होते.