वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड आणि माती चोरी रोखण्यात अपयश !
दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित !
दौंड (जिल्हा पुणे) – तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात चालू असलेली अवैध वृक्षतोड आणि माती चोरी रोखण्यात अपयश आल्याने दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना निलंबित केले आहे. तालुक्यात वनसंरक्षणाचे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याने दौंड येथील वनपाल रवींद्र मगर यांच्या निलंबनानंतर वनपरिक्षेत्रीय अधिकार्यांना निलंबित केले आहे.
१. दौंड वनपरिक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रात बेकायदा वृक्षतोड करून कोळसा भट्टी राजरोसपणे चालू आहे. वनक्षेत्रातील माती वीटभट्टी आणि अन्य व्यवसायासाठी चोरली जाते, याची माहिती असूनही संबंधितांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यात आले.
२. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची नोंद घेत पुणे येथील साहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी वनक्षेत्राची पहाणी केली होती; मात्र दौर्याची पूर्वकल्पना मिळाल्याने कोळसा भट्ट्यांचे मालक आणि मजूर पळून गेले.
३. पहाणी अहवालानंतर दौंडचे वनपाल रवींद्र मगर, पुणे येथील उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना निलंबित केले आहे.
४. वनसंरक्षण करण्याऐवजी वनक्षेत्रात वृक्षतोड करणे, तसेच माती आणि मुरूम यांची चोरी करणार्यांना संमती देत राखीव वनक्षेत्र आणि त्यातील वनचरांचा अधिवास नष्ट केल्याप्रकरणी वनसंरक्षक कार्यालयाने संबंधित अधिकार्यांची चौकशी चालू केली आहे. राखीव वनक्षेत्रातील १३.७२ एकर क्षेत्रात अवैध वृक्षतोड आणि ८१६.८२ टन मातीची चोरी झाल्याचा आरोप अधिकार्यांच्या निलंबन आदेशामध्ये केला आहे.
संपादकीय भूमिकावृक्षतोड करणार्यांचे केवळ निलंबन न करता त्यांना बडतर्फ करण्यासह काही काळ वृक्ष लागवड करण्याची शिक्षा द्यायला हवी ! |