आपण शुद्ध भारतीय होऊया !
आज तिथीनुसार ‘प्रजासत्ताकदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘भारत देश स्वतंत्र झाला आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाची ही लक्षणे असतात –
अ. त्या देशाची प्राचीन परंपरा
आ. त्या देशाची विशेष संस्कृती-धर्म
इ. त्या देशाची आपली भाषा
ई. त्या देशाचे आपले स्वतःचे नियम
उ. आपल्या मातृभूमीची एक विशिष्ट पूजा
स्वतंत्र देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा विशिष्ट परंपरा असतात. मला अत्यंत दुःखाने हे म्हणावे लागत आहे की, आम्ही म्हणायला तर स्वतंत्र झालो आहोत; परंतु आमची मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही. आम्ही अजूनही पाश्चात्त्यांचे अनुकरण करत आहोत.
१. भारताची गुरु-शिष्य परंपरा जपणे आणि भगवंताला न विसरणे महत्त्वाचे
भारत देशाची गुरु-शिष्य परंपरा आहे, यामध्ये सहृदयता आणि आदर असतो. आपल्या देशाची परंपरा ही आहे की, स्वतःची सर्व कामे ईश्वराला केंद्रित ठेवूनच करतो. आज आपल्यामध्ये अनेक दोष निर्माण झाले आहेत. आता भारतियांमध्ये गुरु-शिष्य संबंध असे राहिलेले नाहीत. माझी आपल्याला एकच प्रार्थना आहे की, आपली जी आस्तिकता आहे, जी आपल्या देशाचा प्राण आहे, तिला कधीही विसरू नये. सर्र्वांचा ‘कर्ता करविता हा भगवंतच’ असतो; त्यामुळे आपण भगवंताला विसरू नका. भगवंत ही तर्क करण्याची गोष्ट नसून. ती श्रद्धेची गोष्ट आहे. त्यामुळे वेदांमध्ये पुनः पुन्हा म्हटले आहे, ‘श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा.’
२. भारताची धार्मिक पद्धत हीच त्याची विशेष ओळख !
भारत हा धार्मिक देश आहे. भारताची निर्मिती यासाठी केली नाही की, आमच्या येथे यंत्रे आहेत, कारखाने आहेत. आमच्या देशाचा गौरव धर्मामुळेच आहे; म्हणून आपण धर्माला विसरू नये. भारतीय संस्कृती म्हणा वा भारतीय धर्म म्हणा, दोन्हीही एकच गोष्ट आहे. नर्तकी आणि गायक-गायिका यांची विशेष मंडळे ही खर्या हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तरीही हिंदु संस्कृतीच्या नावाने त्यांना देश-विदेशांत ती पाठवली जातात, हे आमच्या संस्कृतीचा अवमान करण्यासारखे आहे. आमची संस्कृती तर धर्मामध्ये सामावलेली आहे. नृत्य, वाद्य आणि गायन या गोष्टी सुद्धा भारताची विशेष धार्मिक पद्धत आहे; परंतु नुसते नाच-गाणे ही आमची संस्कृतीच नाही.
३. संस्कृत आणि भारतीय भाषा हेच राष्ट्रीयत्व !
भारताची भाषा संस्कृत आहे. संस्कृतच बहुतेक सर्व भारतीय भाषांचा मूळ उगमस्रोत आहे. संस्कृत ही पूर्णपणे वैज्ञानिक भाषा आहे. हिंदी संस्कृतची कन्या आहे; म्हणून आपण जेवढे शक्य होऊ शकेल, तेवढे संस्कृत आणि हिंदी यांच्या सर्व विषयांचे अध्ययन करावे. संस्कृत आणि हिंदी यांचे शिक्षक अन् विद्यार्थी यांना हीन दृष्टीने पहाण्याची एक चाल (षड्यंत्र) खेळली जात आहे, ती संपवली पाहिजे. आपली भाषा शिकणे आणि ती शिकवणारे यांना विदेशी भाषांपेक्षा अधिक गौरवाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. आपले दैनंदिन व्यवहार, बोलणे-चालणे, व्याख्यान, पत्र व्यवहार हिंदी किंवा भारतीय भाषांमधून करावा. पुस्तके-कविता हिंदीमध्येच लिहावेत. भाषा आपल्या राष्ट्रीयतेची सर्वांत मोठी संपत्ती आहे, ती राष्ट्रीयत्वाचा प्राण आहे.
४. भारताची स्वतःची राज्यघटना वेद-शास्त्र-स्मृति यांच्या आधारावर हवी !
आमची राज्यघटना वेद-शास्त्र-स्मृति यांच्या आधारावर असली पाहिजे. आमच्याकडे सृष्टीच्या आरंभापासूनच अत्यंत उन्नत राज्यघटना आहे; परंतु मला दुःख वाटते की, आज जी घटना बनवली आहे, ती इंग्लंड-अमेरिका यांची उष्टावळ आहे, त्यामध्ये भारतीयत्व मुळीच नाही. आम्हाला स्वतःची राज्यघटना पुन्हा बनवायची आहे; कारण आताच्या घटनेत भारतीयत्व नाही. आम्हाला स्वतःची राज्यघटना बनवून त्यामध्ये भारतीयत्व आणायचे आहे.
५. भारतमाता पुन्हा अखंडित करा !
आम्ही भारताला एक निर्जीव भूमीचा तुकडा मानत नाही. भारताला आम्ही मातेचे रूप दिले आहे. ‘हिमालय तिचे शिर आहे. कन्याकुमारी, केरळ, दक्षिणेकडील प्रदेश तिचे पाय आहेत. ओडिशा, बंगाल, पंजाब, सिंधु तिचे ४ हात आहेत’, अशी आमची ‘भारतमाता’ आहे. आमच्या भारतमातेच्या अंगांचे तुकडे तुकडे केले आहेत. आम्हाला खंडित झालेल्या आपल्या मातेला पुन्हा अखंड करायचे आहे.
६. गोमातेवर आधारित अर्थव्यवस्था राबवल्यास देशाची प्रगती निश्चित !
गोमातेची मान्यता आमच्या संस्कृतीचा आधार आहे. सर्व संप्रदाय, सर्व वर्ग, सर्व पक्ष गोमातेला नेहमी ‘अवध्य’ मानत आलो आहोत. आमच्या देशात गोवध करण्याला सर्वथा प्राणांची बाजी लावून बंद करायचे आहे. गोमातेचे उत्थान आणि गोमातेवर आधारित अर्थव्यवस्था यांचा अवलंब करून खेडेगावांपासून शहरांकडे वाढणारे पलायन अन् भूमीची नापीकता रोखली जाऊ शकते. खाद्य पदार्थांना विषरहित बनवून अनेक व्याधींपासून वाचवले जाऊ शकते. भूमी, जल आणि वायू यांच्या प्रदूषणाच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो अन् देशाची अर्थव्यवस्था सुदृढ केली जाऊ शकते.
परमपिता परमात्म्याच्या पदकमलांना माझी हीच प्रार्थना आहे, ‘आम्हाला शुद्ध भारतीय बनवावे. आमच्या मनामध्ये धर्माप्रती प्रेम निर्माण व्हावे. मंगलमय भगवंत आमचे सर्वत्र मंगल करो.’
– गोलोकवासी संत पूज्यपाद श्रीप्रभुदत्त ब्रह्मचारीजी महाराज
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, डिसेंबर २०२१)