तळमळीने प्रचारसेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेले पावस (रत्नागिरी) येथील आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई (वय ७२ वर्षे) !

२३.१.२०२४ या दिवशी पावस (रत्नागिरी) येथील आधुनिक वैद्य सदानंद देसाई (वय ७२ वर्षे) यांचे निधन झाले. उद्या, १८.२.२०२४ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई

१. श्री. नामदेव गुळेकर, मावळंगे, पावस

१ अ. प्रामाणिकपणा : ‘आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई हे एक चांगले व्यक्तीमत्त्व होते. ते व्यवहार आणि हिशोब यात चोख होते. ते नेहमी प्रामाणिकपणे वागले. त्यांनी मुलांवरही प्रामाणिकपणाचे संस्कार केले.

१ आ. तत्परता : एखाद्या रुग्णाने त्यांना कधीही बोलावले, तरी ते त्वरित त्या रुग्णाला तपासायला जात असत.

१ इ. वक्तशीरपणा : त्यांना प्रत्येक गोष्ट वेळेवर करायला आवडायची. त्यांना कुणी वेळ दिलेली असेल, तर ते त्या वेळेच्या आधीच सिद्ध असायचे.

१ ई. साहाय्य करणे : ते साधकांना सर्वतोपरी साहाय्य करत असत.

१ उ. श्रद्धा :  त्यांची स्वामी स्वरूपानंदांवर अतिशय श्रद्धा होती.’

२. सौ. शुभांगी मुळ्ये, रत्नागिरी

२ अ. साधकांविषयी आपुलकी : ‘आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई यांना पावसला कुणीही साधक सेवेला आल्यावर अतिशय आनंद होत असे.

२ आ. भाव : ते स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य होते, तरी त्यांची पू. गुरुदेवांवर अतिशय श्रद्धा होती. परम पूज्यांविषयी बोलतांना त्यांची भावजागृती होत असे.’

३. श्रीमती मंजिरी बेडेकर, रत्नागिरी (वय ६३ वर्षे)

३ अ. प्रत्येक साधकाला सेवेत सहभागी करून घेणे : ‘रत्नागिरी येथील साधक पावस येथे प्रचाराला गेल्यानंतर आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई प्रत्येक साधकाला सेवा देण्याचा प्रयत्न करत.

३ आ. प्रेमळ : कधी साधकांना परत जाण्यास उशीर झाला, तर ते साधकांना जेवायला घालूनच पाठवत असत. त्यांचे घर हे सनातनचे सेवाकेंद्रच झाले होते.

३ इ. परिचयातील प्रत्येकाला साधना सांगणे : (कै.) सदानंद देसाई आधुनिक वैद्य होते, तसेच ते आंबा बागायतदारही होते. ते त्यांच्याकडे येणारे रुग्ण आणि कामगार यांना साधना सांगून सत्संगात येण्यास सांगत असत.

३ ई. अल्प अहं : ते स्वतः बसस्थानकावरून दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘पार्सल’ आणत आणि स्वतःच त्याचे वितरणही करत असत.’

४. श्री. हनुमंत करंबेळकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७३ वर्षे), रत्नागिरी.

४ अ. अनेक वर्षे अविरतपणे प्रचाराची सेवा करणे : ‘वर्ष १९९७ मध्ये पावस येथे परात्पर गुरु डॉक्टरांची जाहीर सभा झाली. त्यानंतर आधुनिक वैद्य (कै.) सदानंद देसाई  यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. त्यांनी त्यांची पत्नी सौ. सरिता देसाई आणि सनातनचे साधक यांच्या साहाय्याने पावस अन् आजूबाजूची गावे गावडे-आंबेरे, मावळंगे, कुर्धे, मेर्वी, गोेळप, गणेशगुळे इत्यादी गावात प्रवचने आणि सत्संग घेणे, दैनिक किंवा साप्ताहिक यांचे वर्गणीदार करणे, अर्पण अन् विज्ञापने घेणे इत्यादींच्या माध्यमातून अनेक वर्षे अविरतपणे प्रचाराची सेवा केली. सनातनचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असत.

४ आ. प्रेमभाव : रत्नागिरी येथे सनातन संस्थेचा कार्यक्रम असेल, तर ते पावसच्या साधकांना त्यांच्या गाडीतून घेऊन येत होते आणि पुन्हा रात्री त्यांच्या त्यांच्या घरापर्यंत सोडत असत.

४ इ. आधार असणे : आधुनिक वैद्य म्हणून ते गावाचा आधार होतेच, तसेच ते पावस उपकेंद्राचेही आधारस्तंभ होते. ते लहान-मोठा असा भेद न करता सर्वांशी समभावाने वागायचे.

४ ई. ते स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहीत होते, तरी त्यांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार झोकून देऊन साधना केली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ८.२.२०२४)