POK Want To Join India : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा !
नागरिकांची स्थिती गुलामांपेक्षा वाईट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आता विनाविलंब त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा आहे. भारतात विलीनीकरणाची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जिवाला धोका असल्याने ब्रिटनमध्ये निर्वासित जीवन जगत असलेले पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी अजमद अयुब मिर्झा म्हणाले, ‘‘प्रतिदिन पाकव्याप्त काश्मिरातील शेकडो लोक मला विचारतात, ‘‘आम्हाला पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार किती दिवस सहन करावे लागणार ?’’
मिर्झा पुढे म्हणाले की,
१. पाकिस्तानी राज्यकर्ते पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हणतात; पण येथील लोकांची अवस्था गुलामांपेक्षाही वाईट आहे.
२. अनेक दशकांपासून स्वातंत्र्याच्या नावाखाली पाकिस्तानी सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्याचार करत आहे आणि काश्मीरमध्ये दहशत पसरवत आहे.
३. आता लोकांना समजू लागले आहे की, जो देश आर्थिक अस्थिरतेच्या उंबरठ्यावर बसला आहे, तो त्यांचे काय भले करू शकेल ? अशा स्थितीत काश्मीरमध्ये इस्लामच्या नावाखाली पसरवलेल्या विषाचा परिणामही ओसरू लागला आहे.
४. तेथील सर्व पायाभूत सुविधा पाकिस्तानी सैन्य आणि सरकार यांच्या कह्यात आहे. येथे सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.
संपादकीय भूमिकाही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे ! आजचा काळ हा कूटनैतिक, आर्थिक, सैनिकी, भूराजकीय आदी सर्वच स्तरांवर भारतासाठी अत्यंत अनुकूल आहे, हे जगही मानते ! |