रात्रीच्या वेळी झालेल्या मोठ्या अपघाताच्या वेळी पलूस (सांगली) येथील श्री. भीमराव खोत (वय ७१ वर्षे) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
‘२१.१२.२०२३ या दिवशी मी दुचाकीने माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी पलूस येथे गेलो होतो. लग्नसमारंभ झाल्यावर मी किर्लाेस्करवाडी येथील माझ्या घरी परत येतांना पलूस येथेच रात्री सुमारे ८.३० वाजता दुचाकीसह मार्गाच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पडलो.
१. रात्रीच्या अंधारात मार्गावर कुणीही नसतांना गाडीसह नाल्यात पडल्यावरही पूर्ण शुद्धीवर असणे
‘रात्रीची वेळ, अंधार, जवळपास मार्गावर कुणीही नाही’, अशा परिस्थितीमध्ये मी दुचाकीसह नाल्यात पडलो आहे’, याची मला जाणीव झाली. उठण्याचा प्रयत्न करूनही मला उठता आले नाही. ‘माझ्या डोक्याला मार लागला असून त्यातून रक्तस्राव होत आहे’, हे माझ्या लक्षात आले. मी पूर्णपणे शुद्धीत होतो. थोड्या वेळाने ‘मार्गावरून २ महिला जात आहेत’, असे माझ्या लक्षात आले. मी त्यांना २ – ३ वेळा ‘मला उठवा, बाहेर काढा’ असे मोठ्याने ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
२. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे लोक साहाय्यासाठी येणे
तेवढ्यात एक तांबूस रंगाचा कुत्रा माझ्या समोरच्या मार्गावर येऊन बसला. तो माझ्याकडे पाहून आधी एका दिशेकडे आणि काही वेळाने दुसर्या दिशेकडे पाहून भुंकू लागला. तेव्हा ‘तो लोकांना बोलावत आहे कि अनिष्ट शक्तींना हाकलत आहे ?’, असा विचार माझ्या मनात आला. थोड्याच वेळात तिथे ३ – ४ व्यक्ती आल्या. त्यांनी मला आणि माझी दुचाकीही नाल्यातून बाहेर काढली. तेव्हा मला वाटले, ‘प.पू. गुरुदेवांनीच त्या कुत्र्याला त्या व्यक्तींना बोलावण्यासाठी पाठवले.’
३. शीघ्रतेने वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे जीव वाचणे
मी त्या व्यक्तींना माझा भ्रमणभाष देऊन माझा मुलगा श्री. रणजीत खोत याला कळवण्यास सांगितले. त्यांच्यापैकी एकाने त्याच्याकडे असलेला टॉवेल माझ्या डोक्यावरील जखमेला गुंडाळला. मी त्यांना सांगितले, ‘‘आधुनिक वैद्य मनोज इंगळकर यांचे रुग्णालय जवळ आहे. तिथे मला घेऊन चला.’’ त्यांच्यापैकी एकाने मला दुचाकीवरून आधुनिक वैद्य इंगळकर यांच्या रुग्णालयात नेले. तिथे आधुनिक वैद्य इंगळकर आणि आधुनिक वैद्या (सौ.) मनीषा इंगळकर यांनी माझ्यावर उपचार करून माझा जीव वाचवला. आधुनिक वैद्य इंगळकर मला म्हणाले, ‘‘तुमच्या डोक्यावरील जखमेस ३२ टाके घालावे लागले.’’ तेव्हा मला वाटले, ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच मला जीवदान मिळाले.’
४. साधकांनी केलेले साहाय्य
ज्या लोकांनी मला रुग्णालयात नेले, त्यांनी दुसर्या दिवशी रुग्णालयात येऊन माझी विचारपूस केली. साधकांनी तत्परतेने माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारून घेऊन मला ते करण्यास सांगितले. साधकांनी मला प.पू. गुरुदेवांचा प्रसादही रुग्णालयात आणून दिला.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रसंगात स्थिर रहाता येणे
आधुनिक वैद्या (सौ.) मनीषा इंगळकर यांनी एका साधकाला विचारले, ‘‘खोतकाका एवढे स्थिर कसे राहू शकतात ?’’ तेव्हा साधक त्यांना म्हणाले, ‘‘त्यांच्यावर गुरुकृपा आहे.’’ खरोखरच अपघात झाल्यावर माझ्या मनात मायेतील किंवा कुटुंबाविषयी कुठलेही विचार आले नाहीत. ‘मी शांत आणि स्थिर राहून या प्रसंगाला तोंड देऊ शकलो’, हा खरोखरच प.पू. गुरुदेवांचा कृपाशीर्वाद आहे. त्यांनी या कठीण प्रसंगातून मला अलगद बाहेर काढले. ही गुरुलीला आहे. ‘स्वभावदोष आणि अहं यांनी युक्त अशा या जीवाकडून जी काही थोडीफार गुरुसेवा करण्याचा प्रयत्न झाला’, त्यामुळे प.पू. गुरुदेवांनी मला जीवनदान दिले’, यात तीळमात्रही शंका नाही.
६. कृतज्ञता
‘गुरु तोचि देव ऐसा ठेवीं भाव ।’ मला स्वामी स्वरूपानंद यांच्या या ओळीचे स्मरण झाले. या प्रसंगातून ‘प.पू. गुरुदेवच माझा भार वहात आहेत’, याची मला प्रचीती आली. प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. भीमराव खोत, पलूस, जिल्हा सांगली. (१४.१.२०२४)
|