सतत भावस्थितीत असणार्‍या सनातनच्या ४५ व्या (समष्टी) संत पू. (कै.) सौ. सूरजकांता भगवंतकुमार मेनराय (वय ७७ वर्षे) !

‘वर्ष २०१७ मध्ये पू. (कै.) सौ. मेनरायकाकू यांचे वास्तव्य रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होते. त्यांनी वर्ष २०२० मध्ये देहत्याग केला. जेव्हा त्या आश्रमात नामजप करत असत, तेव्हा साधकही त्यांच्या समवेत नामजप करत असत. त्या वेळी विविध प्रसंगांमध्ये मला त्यांचा सत्संग लाभला. तेव्हा मला त्यांच्याकडून पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांच्या चवथ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (सौ.) सूरजकांता मेनराय

१. पू. (सौ.) मेनरायकाकू यांनी सांगितल्यामुळे सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमाच्या सभोवतालचा निसर्ग पहात असतांना ‘हा निसर्ग नसून वृंदावनातील दैवी वनप्रदेश आहे’, असे साधिकेला जाणवणे

वर्ष २०१७ मध्ये मला पुष्कळ ताप आल्याने मी रुग्णाईत होते. तेव्हा पू. (सौ.) मेनरायकाकू मला पहाण्यासाठी माझ्या खोलीत आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आमच्या खोलीतील खिडकीतून दिसणारा निसर्ग पाहून मला सांगितले, ‘‘हे तर साक्षात् वृंदावन आहे.’’ त्यांनी असे उद्गार काढल्यावर माझा निसर्गाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला. त्यामुळे जेव्हा जेव्हा माझी दृष्टी निसर्गाकडे जाते, तेव्हा तेव्हा मला ‘हा निसर्ग नसून वृंदावनातील दैवी वनप्रदेश आहे’, असे जाणवते आणि श्रीकृष्णतत्त्वाची अनुभूती येऊन शांत वाटते.

२. पू. (सौ.) मेनरायकाकू सूक्ष्मातून वृंदावनात वावरत असल्याचे जाणवणे

जेव्हा जेव्हा आम्हाला पू. (सौ.) मेनरायकाकू भेटत होत्या, तेव्हा तेव्हा ‘त्या भावावस्थेत वावरत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या मला आणि माझ्या आईला पाहून म्हणायच्या, ‘‘चलो गोपीयों, तैयार हो जाओ । हमें वृंदावन में जाना है ।’’ त्या वेळी ‘त्या सूक्ष्मातून वृंदावनात वावरत आहेत’, असे आम्हाला जाणवून आमचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत होत होता.

३. संत तुलसीदासांचे ‘श्रीरामचरित मानस’ यातील प्रभु श्रीराम सीतेला शोधत असतांना त्यांची हनुमानाशी अकस्मात् भेट झालेल्या प्रसंगाचे वाचन करत असतांना रामाच्या शेजारी सूक्ष्मातून बसलेल्या दास्यरूपातील हनुमानाच्या डोळ्यांतून भावाश्रू वहातांना दिसणे

पू. (सौ.) मेनरायकाकूंचा प्रभु श्रीरामाप्रतीचाही पुष्कळ भाव होता. त्यामुळे ‘त्यांच्या समवेत सतत श्री हनुमानाचे दास्यरूप वावरत आहे’, असे जाणवत होते. एकदा मला त्या त्यांच्या रहात्या खोलीत घेऊन गेल्या आणि मला संत तुलसीदासांच्या श्रीरामचरित मानसातील एक परिच्छेद वाचून दाखवला. या परिच्छेदामध्ये प्रभु श्रीराम सीतेला शोधत असतांना त्यांची हनुमानाशी अकस्मात् भेट झालेल्या प्रसंगाचे वर्णन होते. हे वर्णन त्या इतक्या भावपूर्णरित्या वाचत होत्या की, त्यांच्या खोलीमध्ये मला घनदाट वन सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवले आणि त्यांच्या शेजारी सूक्ष्मातून बसलेल्या दास्यरूपातील हनुमानाच्या डोळ्यांतून भावाश्रू वहातांना दिसले.

४. अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला सूक्ष्मातून उपस्थित असणार्‍या पू. (कै.) सौ. मेनरायकाकूंच्या डोळ्यांतून वहाणार्‍या भावाश्रूंनी श्री रामलल्लावर सूक्ष्मातून भावाचा अभिषेक केल्याचे जाणवणे

२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा भावसोहळा पहाण्यासाठी पू. (सौ.) सूरजकांता मेनराय या वैकुंठातून पृथ्वीच्या जवळ सूक्ष्मातून आल्याचे मला जाणवले. हा सोहळा पहात असतांना त्या श्री रामलल्लाच्या मूर्तीवर सूक्ष्मातून पुष्पवृष्टी करत होत्या. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वहाणार्‍या भावाश्रूंनी श्री रामलल्लावर सूक्ष्मातून भावाचा अभिषेक केल्याचे जाणवले. त्यांची भक्ती पाहून हा भाव सोहळा पहाण्यासाठी विविध लोकांतून सूक्ष्मातून आलेले पुण्यात्मे, धर्मात्मे, दिव्यात्मे आणि ऋषिमुनी यांची भावजागृती झाल्याचे जाणवले. इतकी त्यांची भक्ती होती.

अशा प्रकारे पू. (सौ.) मेनरायकाकू या दैवी संत असून त्या अखंड भावावस्थेत असल्याचे जाणवले. त्यामुळे आजही त्यांचे स्मरण झाले, तर साधकांना त्यांची देवाप्रती असणारी भक्ती आणि साधकांप्रती असणारी प्रीती अनुभवण्यास मिळते.’

कृतज्ञता ः सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हा साधकांना त्यांच्या भावावस्थेतील संत आणि प्रभूचे प्रिय भक्त असणार्‍या पू. (सौ.) मेनरायकाकू यांचा अनुपम सत्संग मिळाल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता वाटते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक