सनातनच्या ५४ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती मंगला खेर यांच्याविषयी त्यांची सून सौ. मीनल खेर यांना जाणवलेली सूत्रे !

‘१६.२.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) खेरआजी यांची प्रथम पुण्यतिथी आहे. ‘पू. आजींना कुणा साधकाला काही त्रास होत असेल, तर ते समजत होते आणि त्या त्याची विचारपूस करत असत’, असे माझ्या लक्षात आले होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मला त्यांच्याविषयी जाणवलेली काही सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (कै.) श्रीमती मंगला खेरआजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (श्रीमती) मंगला खेर

१. पू. खेरआजींची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता !

१ अ. श्री. गुरव यांच्या मुलाला अपघात झाल्यामुळे पू. खेरआजी त्यांची विचारपूस करत असणे : चिपळूणहून श्री. विनायक आगवेकर

सौ. मीनल खेर

(आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सौ. मंजिरी आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आले होते. तेव्हा पू. आजी ‘नाना गुरव का ?’, असे विचारत होत्या. ‘श्री. गुरव यांच्या मुलाला अपघात झाला’, हे मला नंतर दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वार्ता वाचून कळले. ‘त्यांच्या मुलाला अपघात झाल्यामुळे पू. आजी त्यांची आठवण काढत होत्या’, असे माझ्या लक्षात आले.

१ आ. श्रीमती बेडेकर रुग्णाईत असतांना पू. आजींनी त्यांची आठवण काढणे : पू. आजी श्रीमती बेडेकरवहिनींचीही बर्‍याच वेळा आठवण काढत असत. नंतर आम्हाला ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे कळायचे. ‘त्या रुग्णाईत असल्यावर पू. आजी त्यांची आठवण काढतात’, असे नंतर माझ्या लक्षात आले.

२. ‘पू. आजी सूक्ष्मातून कार्यपूर्तीसाठी आशीर्वाद देतात’, असे जाणवणे

सनातन संस्थेचा कार्यक्रम असतांना नामजपादी उपायांसाठी माझ्याकडे काही साधकांची नावे येतात. मी ती पू. आजींच्या छायाचित्रासमोर ठेवून त्यांना प्रार्थना करते. त्या त्याविषयी गुरुदेवांना सांगून ‘आम्हाला (मला आणि त्या साधकांना) आशीर्वाद देतात’, असे मला जाणवते.

३. घरात पू. आजींचे अस्तित्व जाणवणे

मला आमच्या घरात पुष्कळ चैतन्य जाणवते. बाहेर जातांना मला ‘पू. आजी घरात आहेत. काही काळजी नाही’, असेच वाटते.

‘गुरुदेव, तुम्ही आम्हाला अशा आध्यात्मिक पू. आजी दिल्या’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

–  सौ. मीनल मिलिंद खेर (पू. खेरआजींची सून, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), रत्नागिरी. (१४.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक