चिनी आस्थापनांमुळे नेपाळमधील अनेक विकास प्रकल्प रखडले !

  • नेपाळ सरकार त्रस्त !

  • चीनने मात्र नेपाळला ठरवले उत्तरदायी !

काठमांडू (नेपाळ) – चीनसमवेत मैत्री वाढवण्याचा नेपाळला फटका बसत आहे. नेपाळमध्ये चिनी आस्थापनांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये पुष्कळ विलंब होत आहे. तेथील अनेक पायाभूत प्रकल्पांचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. अनेक प्रकल्पांची समयमर्यादा उलटून गेली आहे. या आस्थापनांकडे नेपाळमधील प्रमुख विमानतळे, विविध धरणे, पूर्व-पश्‍चिम महामार्गाचे नूतनीकरण, मुग्लिन-पोखरा महामार्ग, तेराई-मधेश द्रुतगती महामार्गातील बोगदे उभारणे आदी प्रकल्प आहेत.

या प्रकल्पांना विलंब होत असल्याने बांधकामाचा खर्च वाढू लागणे, ही नेपाळला डोकेदुखी बनली आहे. संतापलेले सामान्य नेपाळी नागरिक अनेक महिन्यांपासून निदर्शने करत आहेतच; पण आता नेपाळच्या राजकीय वर्तुळातूनही चीनला विरोध होऊ लागला आहे. जागतिक संस्था आणि बँका यांच्या निधीतून नेपाळमध्ये हे प्रकल्प चालू आहेत. चीनने अर्थसाहाय्य केलेले प्रकल्पही पूर्णत: ठप्प झाले आहेत.

एका कार्यक्रमाच्या वेळी नेपाळमधील चीनचे राजदूत चेन सॉन्ग यांनी एका प्रकल्पातील विलंबासाठी नेपाळलाच उत्तरदायी धरले आहे. ते म्हणाले की, चिनी आस्थापने इतर देशांतील प्रकल्प वेळेवर पूर्ण करत आहेत, मग नेपाळमध्ये त्यांना अपयश का येत आहे ? या विलंबाला नेपाळच उत्तरदायी आहे.

या प्रकल्पांची स्थिती बिकट !

१. ‘रसुवागढी-केरुंग ट्रान्समिशन लाईन’ची अनिश्‍चितता कायम आहे.

२. नेपाळमधील महामार्ग विभागाचे महासंचालक सुशीलबाबू ढकाल म्हणाले, चिनी कंत्राटदार असलेल्या महामार्ग प्रकल्पांची कामे रखडणे सामान्य गोष्ट झाली आहे. ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’च्या साहाय्याने वर्ष २०१९ मध्ये नारायणघाट-बुटवलचा ११६ किमीचा भाग तयार होणे अपेक्षित होते; परंतु वर्ष २०२४ आले, तरीही या रस्त्याचे ४३ टक्क्यांपेक्षाही अल्प काम पूर्ण झाले आहे.

संपादकीय भूमिका 

गरीब देशांच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवणारा स्वार्थांध चीन ! चीनशी हातमिळवणी करणार्‍या नेपाळचा आत्मघात कसा होत आहे ?, हे या उदाहरणातून स्पष्ट होते ! पाकिस्तान आणि मालदीव हेही त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहेत, हेही उघड आहे !