UP Halal Certificate : उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र देण्यामागे एका मोठ्या उलेमाचा हात !

(उलेमा म्हणजे इस्लाम धर्माविषयीचा ज्ञानी)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हलाल प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील एका मोठ्या उलेमाचे नाव समोर आले आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाला  (‘एस्.टी.एफ्.’ला) याविषयी अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. ‘ऑप इंडिया’ने हे वृत्त प्रसारित केले आहे. या प्रकरणी ‘एस्.टी.एफ्. ने’ १२ फेब्रुवारी २०२४ या  दिवशी ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब युसूफ पटेल, उपाध्यक्ष मौलाना मुईदशीर सपदिहा, महासचिव मुफ्ती ताहिर झाकीर आणि कोषाध्यक्ष महंमद अन्वर खान यांना मुंबईतून अटक केली होती. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली विविध आस्थापनांकडून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

‘इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई’, ‘जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट देहली’ आणि ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया मुंबई’, या मुसलमान संस्था विविध आस्थापनांना हलाल प्रमाणपत्र देत होत्या. ‘ही सर्व उत्पादने मुसलमानांनी शरीयत अंतर्गत सिद्ध केली असून ती मुसलमान वापरू शकतात’, हे दाखवणे हा या प्रमाणपत्र देण्यामागचा उद्देश होता.

१. ‘एस्.टी.एफ्.’ने हलाल प्रकरणाशी संबंधित आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली असून त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात येत आहे.

२. ही रक्कम देशासह परदेशातील बँक खात्यांमध्ये पाठवली जात होती. त्यामुळे त्याचा देशविरोधी कारवायांमध्ये वापर होत असल्याचा संशय आहे.

३. आतापर्यंत अनुमाने २० आस्थापनांची नावे समोर आली आहेत, ज्यांच्याशी वरील आरोपी व्यवहार करत होते.

४. गेल्या वर्षी योगी आदित्यनाथ सरकारने उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्रासह वस्तू विकल्याच्या प्रकरणी लोकांना कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला होता.