मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा संघटना आक्रमक !
राज्यातील विविध भागांत बंद !
जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी ११ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांनी अन्न-पाणी घेण्यास नकार दिला आहे. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ञांचे एक पथक उपस्थित आहे; परंतु मनोज जरांगे पाटील वैद्यकीय पथकाकडून पडताळणी करून घेण्यास किंवा उपचार करून घेण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालावली आहे. शरिरातील पाण्याची पातळी अल्प झाल्याने पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्याच्या विविध भागांत बंद पुकारला आहे.
बारामती आणि आळंदी येथे कडकडीत बंद !
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाने पुण्यातील देवाची आळंदी येथे बंदची हाक दिली. त्याला आळंदीकरांनी प्रतिसाद दिला. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर येथेही मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद उमटले आहेत.
अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याची अहिल्यानगरमधील आंदोलकांची मागणी
अहिल्यानगर शहरासह कर्जत, पारनेर आणि जामखेड तालुक्यांत बंद पाळण्यात आला. ‘अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा, अधिसूचनेप्रमाणे सगेसोयरेही कायद्यात समाविष्ट करा’, या आंदोलकांच्या मागण्यांसाठी शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात आला. सोलापूर, मनमाड येथेही बंद पाळण्यात आला.
बीडमध्ये जमावबंदी आदेश लागू !
सतर्कता म्हणून प्रशासनाच्या वतीने बीडमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. बीडमधील सर्व बाजारपेठा बंद होत्या, तसेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
धाराशिवमध्ये बसवर दगडफेक !
सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी येथे एस्.टी. महामंडळाच्या बसवर दगडफेक केली.
आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक हरकती प्राप्त !
सरकारला मराठा आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती सादर करण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंतची समयमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे या हरकतींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
झोपेत सलाईन लावल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप !
जालना – झोपेत सलाईन लावले असून मी मेलो, तर सरकारच्या दारात नेऊन टाका. सलाईन लावण्यापूर्वी आरक्षणाची कार्यवाही कधी करता हे सांगा, अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा, मी एकटा मुंबईला जाईन, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
जरांगेंच्या डोक्यावर परिणाम ! – राणे
मुंबई – मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते बडबड करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही’, असे म्हटले होते. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये १० फेब्रुवारीपासून उपोषण चालू केले आहे.