परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा यांतील आनंद अनुभवणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे) यांनी उलगडलेला स्वतःचा साधनाप्रवास !

सौ. नंदिनी पोकळे

१. मारुतीची भक्ती केल्याने अडचण दूर होऊन महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळणे

‘कर्नाटक राज्यातील कारवार येथे श्री राधाकृष्ण मंदिर आहे. मला लहानपणापासून ‘राधाकृष्ण’ हा देव पुष्कळ आवडायचा. इथले मारुति मंदिर हे जागृत देवस्थान आहे. मी मंदिरात जाऊन ‘नमस्कार करणे, प्रदक्षिणा घालणे आणि तीर्थ-प्रसाद घेणे’, या कृती करायचे.

माझा दहावीचा निकाल लागल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मला महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात समस्या निर्माण झाली होती. मला घरातील सर्वांनी वाणिज्य (कॉमर्स) किंवा कला (आर्ट्स) शाखेत प्रवेश घ्यायला सांगितले होते. मला विज्ञान शाखेत शिक्षण घ्यायचे होते. विज्ञान शाखेचे महाविद्यालय खासगी असून तेथे शुल्क अधिक होते. त्या वेळी विज्ञान शाखेचे महाविद्यालय शासनाच्या नियंत्रणात आणण्यासाठी संप चालला होता. या आशेवर मी विज्ञान शाखेत जायचे ठरवले. महाविद्यालयामध्ये प्रवेश अर्ज भरायच्या एक दिवस आधी विज्ञान आणि कला शाखा शासन पुरस्कृत (सरकारी) झाल्या. त्यामुळे मला विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला. मारुतीची भक्ती केल्यामुळेच हे शक्य झाले.

२. ईश्वरी इच्छेमुळे ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळणे

माझे शिक्षण कारवार येथील ‘हिंदु हायस्कूल’मध्ये झाले. मी पदवीधर असल्यावर मला याच शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. माझा शिक्षिका होण्याचा विचारही नव्हता, तसेच मी ज्या शाळेत शिकले, तेथे नोकरी करण्यास मी कधीच गेले नसते; परंतु ‘हे ईश्वरी इच्छेमुळे झाले’, असे मला जाणवले.

३. सनातनशी संपर्क आणि साधनेला आरंभ

श्री. उल्हास पोकळे

राधाकृष्ण मंदिरात मी जवळजवळ २० वर्षे कीर्तने ऐकली. तेथे सनातन संस्थेच्या वतीने सत्संग चालू होता. वर्ष १९९६ मध्ये मी त्या सत्संगाला जाऊ लागले. ‘देवाची भक्ती कशी करायची ?’, हे मला ठाऊक नव्हते. सनातनच्या सत्संगांतून ‘देवदर्शन कसे घ्यायचे ? देवाची भक्ती कशी करायची ? ‘नमस्कार, प्रार्थना आणि सेवा’, हे भावपूर्ण कसे करायचे ?’ इत्यादी मला शिकायला मिळाले.

४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती ! 

४ अ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ वाचतांना आनंद वाटणे आणि त्यानंतर प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘मीच तो ग्रंथ तुझ्याकडून वाचून घेतला’, असे सूक्ष्मातून सांगणे : वर्ष १९९७ मध्ये मी ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ घरी आणला. मी तो ग्रंथ देवघरात ठेवला. रात्री साधारण ९ वाजता मी तो ग्रंथ वाचायला घेतला. तो ग्रंथ वाचतांना मला पुष्कळ आनंद वाटत होता. मी रात्रभर बसून पूर्ण ग्रंथ वाचला. दुसर्‍या दिवशी सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मला म्हणाले, ‘मीच तो ग्रंथ तुझ्याकडून वाचून घेतला.’

४ आ. प.पू. बाबांचे छायाचित्र घरी आणल्यावर त्यांनी सूक्ष्मातून ‘हे छायाचित्र हलवू नका’, असे सांगणे : त्यानंतर मी प.पू. बाबांचे एक छायाचित्र घरी आणले. तेव्हा सूक्ष्मातून प.पू. बाबा मला म्हणाले, ‘हे छायाचित्र हलवू नका.’ मी सूक्ष्मातून प.पू. बाबांना म्हणाले, ‘हे छायाचित्र कोणीही हलवणार नाही.’ आमच्या घरातील देवघराच्या खालच्या आणि वरच्या भागात प.पू. बाबांची छायाचित्रे आहेत.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले घरी आल्यावर त्यांनी वापरलेल्या ताटल्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

५ अ. ‘ताटल्या बोलत आहेत’, असे जाणवणे आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर प.पू. गुरुदेवांची आठवण येणे : जानेवारी १९९८ मध्ये हिंदु हायस्कूलच्या पटांगणात गुरुदेवांचे जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांची रहाण्याची व्यवस्था आमच्या घरी करण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला त्यांच्या सेवेची संधी लाभली. त्या वेळी आम्ही काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या, उदा. स्टीलच्या ३ ताटल्या, ३ वाट्या, ३ पेले, २ चादरी (बेडशीट्स), २ टॉवेल, २ ताटे इत्यादी. त्यांतील स्टीलच्या ताटल्यांचा आकार वेगळाच असून त्या अत्यंत सुंदर होत्या. त्या मला फारच आवडायच्या. आताही ‘प.पू. गुरुदेवांनी वापरलेल्या त्या ताटल्या माझ्याशी बोलत आहेत आणि मला बोलवत आहेत’, असे मला जाणवते. मला त्यांच्यात प्रीती जाणवते. त्या मला आनंद देतात. त्या मला प.पू. गुरुदेवांची सतत आठवण करून देतात.

५ आ. गेल्या २६ वर्षांपासून वापरात असलेल्या त्या ताटल्या आताही जशाच्या तशा असणे : वर्ष १९९८ ते २०२४, म्हणजे गेली २६ वर्षे या ताटल्या आम्ही वापरत आहोत. आम्ही प्रतिदिन सकाळचा अल्पाहार त्याच ताटल्यांत घेतो. मी तर कधी कधी रात्रीचे जेवणही त्यातच घेते. या ताटल्या कितीतरी वेळा खाली पडल्या, तसेच गृहकार्यसाहाय्यक बाईंनी धुतल्या, तरीही त्या जशाच्या तशाच आहेत.

‘आम्हा पोकळे कुटुंबियांना गुरुदेव आणि डॉ. कुंदाताई यांची भेट होणे अन् त्यांचे मार्गदर्शन  मिळणे’, हे आमचे भाग्य आहे.

६. दोनापावला (गोवा) येथील सेवाकेंद्रात जाऊन विविध सेवा करणे

वर्ष १९९९ मध्ये उन्हाळ्याच्या सुटीत प.पू. गुरुदेवांनी मला दोनापावला (गोवा) येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी बोलावले. त्या वेळी माझा मुलगा रोशन ५ वर्षांचा होता. त्याला यजमानांजवळ ठेवून मी गोव्याला गेले आणि २५ दिवस सेवाकेंद्रात राहिले.  तेथे मला ‘प.पू. गुरुदेव आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांचे जेवण बनवणे, गुरुदेवांचे दैनंदिन वापरातील कपडे धुणे आणि त्यांना इस्त्री करणे, साधकांसाठी स्वयंपाक करणे’ इत्यादी सेवा मिळाल्या. गुरुदेवांनी माझ्याकडून प्रत्येक पदार्थ सात्त्विक, रुचकर आणि साधकांना आवडेल, असा बनवून घेतला. माझ्या मुलाची शाळा चालू होण्याच्या आदल्या दिवशी गुरुदेवांनी मला कारवारला घरी जायला सांगितले.

७. वर्ष २००० मध्ये मी आणि माझे यजमान (श्री. उल्हास पोकळे) फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे सेवेसाठी गेलो होतो.’

– सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (२१.१०.२०२३)


प.पू. गुरुदेवांचे जाहीर प्रवचन आणि कर्नाटकमधील पहिली गुरुपौर्णिमा

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१९.२.१९९७ या दिवशी राधाकृष्ण मंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. मला तेथे सेवा करण्याची संधी मिळाली. नंतर जुलै १९९७ मध्ये कर्नाटक राज्यातील पहिला गुरुपौर्णिमा उत्सव कारवार येथील हिंदु हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. गोव्यातील साधकांच्या मार्गदर्शनानुसार ती गुरुपौर्णिमा झाली.

वर्ष १९९७ पासून माझ्या साधनेला पुष्कळ विरोध झाला. मला माझे शाळेतील सहकारी ‘सनातनमध्ये जाऊ नकोस’, असे नेहमी सांगायचे आणि मला टोचून बोलायचे. मला सेवेच्या वेळेत शाळेत थांबवून घ्यायचे, तरीही प.पू. गुरुदेवांच्या कृपेने या अडचणींवर मात करून मी सेवा करत होते आणि मला सेवेतून पुष्कळ आनंद मिळत होता.

– सौ. नंदिनी उल्हास पोकळे

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/765155.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक