नाटक हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने अधिक परिणाम करणारे असणे, त्यामुळे नाट्यकलेच्या माध्यमातून मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्या मनावर धर्माचे संस्कार होऊन त्यांच्या साधनेचा पाया सिद्ध होऊ शकणे
८.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सौ. शुभांगी शेळके यांना बालवयात नाटकांची आवड कशी निर्माण झाली ? आणि त्याचा त्यांना साधनेसाठी कसा लाभ झाला ?’, ते पाहिले. या भागात ‘सौ. शेळके यांनी केलेली उद्बोधन करणारी नाटके’ याविषयी पहाणार आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/762610.html
४. ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’च्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवड होणे’ हा केवळ गुरुकृपेने जुळून आलेला योगायोगच !
पदवी शिक्षणानंतर आवड असूनही मला या क्षेत्रात काही करण्यापेक्षा घरच्या परिस्थितीमुळे नोकरी पत्करावी लागली होती. त्यामुळे या क्षेत्रातील काही शिकण्याची शक्यता नसतांनाही माझी ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या’ अभ्यासक्रमासाठी निवड झाली. हा केवळ गुरुकृपेने जुळून आलेला योगायोगच होता. ‘नोकरी करत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नाही’, असा तिथे नियम होता; पण तरीही मी तिथे ‘ऑडीशन’साठी (कलाकाराच्या चाचणीसाठी) गेले आणि माझी तिथे निवड झाली.
५. व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काम न करणे, यातून ‘देवानेच या क्षेत्रातील रज-तम यांपासून दूर ठेवले’, असे वाटणे
माझा वरील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मी प्रयत्न केले असते, तर या क्षेत्रात मला व्यावसायिक स्तरावर दूरचित्रवाणी किंवा नाटके यांमध्ये कामे मिळालीही असती; पण देवानेच मला त्यापासून दूर ठेवून केवळ प्रयोगात्मक स्तरावरचे (म्हणजे ती व्यावसायिक किंवा केवळ मनोरंजन करणारी नाटके नसून कलात्मक किंवा उद्बोधन करणारी असतात.) काम करून घेतले. देवानेच मला या मायाजाळापासून दूर ठेवले.
६. देवाने मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आणि उद्बोधक अशा नाटिका करण्याची दिलेली संधी !
६ अ. देवाने ‘सत्यसाईबाबा फाऊंडेशन’च्या वतीने घेण्यात येणार्या स्पर्धेत तरुण पिढीला उद्बोधक असे नाटक बसवून घेणे : वर्ष २०१३ मध्ये मला ‘सत्यसाईबाबा फाऊंडेशन’च्या वतीने घेण्यात येणार्या सुसंस्कारांवर आधारित एका नाट्यस्पर्धेसाठी सहभागी झालेल्या नांदेडच्या ‘आय. टी.’ महाविद्यालयासाठी तरुण पिढीवर आधारित एका नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. या नाटकात ‘काही विद्यार्थ्यांना बालपणापासून तरुणपणापर्यंत आणि घरापासून ते समाजापर्यंत कुठेही धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे ‘त्यांची कशी अधोगती होते ?’, याचे विदारक चित्रण केले होते. त्याच समवेत ‘आता आम्हाला ही स्थिती पालटायची असून ‘धर्मशिक्षण घेणे’, हा आमचा मुलभूत अधिकार आहे’, असा शेवटी संदेश दिला. त्या स्पर्धेत या नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला. ‘सत्यसाईबाबा फाऊंडेशन’च्या अध्यक्षांना हे नाटक पुष्कळ आवडले. ते म्हणाले, ‘‘तरुण पिढीला संस्कारांच्या दृृृष्टीने योग्य वळण देणारे हे नाटक आहे.’’
यातून ‘समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या घडवणार्या नाटकांची आवश्यकता आहे आणि तशी मागणीही आहे’, हे माझ्या लक्षात आले.
६ आ. एका व्यावसायिक नाटकात काम मिळून बर्यापैकी सराव झाल्यानंतर ते नाटक सोडावे लागणे : मला एका नाटकात भूमिका करायची होती. माझा त्या भूमिकेचा बराच सरावही झाला होता; पण अकस्मात् काही अडचणींमुळे मला ती भूमिका सोडावी लागली. काही दिवसांनी माझ्या मनात आले, ‘मानवी नात्यांच्या गुंतागुंतीच्या विचारांत अडकवणार्या भूमिका करण्यापेक्षा काहीतरी आनंददायी आणि उद्बोधक करावे.’ देवानेच मला ती भूमिका सोडण्याची सद्बुद्धी दिली.
६ इ. देवाने ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या मुलावर संस्कार करणारी नाटिका सादर करण्याची संधी देणे : नांदेड विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी श्री. रामचंद्र शेळके (माझे यजमान) यांना त्यांनी लिहिलेल्या ‘ओवी गाऊ विज्ञानाची’(टीप) या ग्रंथावर आधारित नाट्यनिर्मिती होऊ शकते का ?’, असे विचारले. यजमानांनी त्यांना लगेचच होकार दिला. घरी आल्यावर यजमानांनी तो ग्रंथ माझ्या हातात दिला आणि विचारले, ‘‘लोककलेच्या शैलीत तुला या ग्रंथावर नाटक करायचे आहे. करशील का ? तुझ्याकडे ७ दिवसांचा वेळ आहे.’’ मला ‘इतकी कठीण संकल्पना नाट्यरूपात सादर करणे आणि तेही ७ दिवसांत’ हे केवळ अशक्य वाटले; पण माझा दुसरा भाऊ दिवाकरने (श्री. दिवाकर आगावणे याने) मला यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले. त्यामुळे मला ती संपूर्ण संकल्पनाच कळली.
(टीप – या ग्रंथात जगातल्या प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या संशोधकांच्या कार्याचा ओवीबद्ध रचनापद्धतीने आढावा घेतला आहे; पण मी या ग्रंथातील केवळ प्राचीन ऋषिमुनींच्या कार्यावर आधारित केलेली नाट्यरचना लोककलांच्या माध्यमातून सादर केली.)
६ ई. ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या नाटिकेतून ऋषिमुनींचे संशोधन कार्य लोककलेच्या माध्यमातून प्रस्तुत केल्यावर लोकांना भारतीय संस्कृतीची प्रगल्भता लक्षात येणे : इ.स. पूर्व सहाव्या शतकात सुश्रुत मुनींनी मानवी देहाचा केवळ सखोल अभ्यास केला नव्हता, तर त्या काळात त्यांनी ‘प्लास्टिक सर्जरी’चा शोध लावला आणि ते यशस्वीपणे ‘प्लास्टिक सर्जरी’ करतही होते. त्यामुळेच आजही जागतिक पातळीवर ‘प्लास्टिक सर्जरी’साठी जे कातडे वापरतात त्याला ‘इंडियन फ्लॅप’, असे संबोधतात. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी ऋषींनी खगोलशास्त्रात केलेले संशोधन अवाक् करणारे आहे. या नाटकाच्या माध्यमातून लोकांना हा भाग कळल्यावर आम्हाला पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला. काहींनी ‘आपल्या शालेय अभ्यासक्रमात हे शिकवले जात नाही’, अशी खंत व्यक्त केली. त्याच समवेत ‘या नाटकाचे शाळा-महाविद्यालये यांमध्ये प्रयोग व्हायला हवेत’, असे अभिप्रायही लोकांनी व्यक्त केले.
दुसरे महत्त्वाचे सूत्र, म्हणजे आपल्याकडे या संशोधकांचा तत्कालीन राजांकडून सन्मान केला गेला आणि त्यांचे संशोधन पुरस्कृतही केले गेले; मात्र पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये १७ व्या शतकातही गॅलिलिओने ‘पृथ्वी गोल आहे’, असे सांगितल्यावर तत्कालीन चर्चच्या पोपने मृत्यू येईपर्यंत त्याला एकाच घरात डांबून ठेवण्याचे कठोर शासन केले. यांतून भारतीय संस्कृतीची प्रगल्भता आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा संकुचितपणाही या नाटकातून दर्शवला गेला. त्याचा विद्यार्थी आणि जनमानस यांच्यावर पुष्कळ चांगला प्रभाव पडला.
वरील विवेचनातून ‘समाजातील लोकांना मुलांवर संस्कारांच्या दृष्टीने चांगले काही हवे आहे. नाटक हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने ते अधिक प्रभावी अन् परिणामकारकही आहे. त्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर अध्यात्माची गोडी लागण्याकरता ‘नाटक’ हे अत्यंत प्रभावी माध्यम असून नाट्यकलेच्या माध्यमातून धर्मशिक्षण देता येऊ शकते’, असे माझ्या लक्षात आले.’
– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.४.२०१७)
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |