‘निर्विचार’, हा नामजप ऐकतांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. विनयकुमार यांना आलेल्या अनुभूती
१. एका प्रसंगामुळे मनावर ताण येऊन मनातील विचार पुष्कळ वाढणे
‘१२.६.२०२१ या दिवशी एका प्रसंगावरून मला पुष्कळ ताण आला होता. त्यामुळे माझी सेवेत एकाग्रता होत नव्हती. मी अत्तर-कापूर लावणे, स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे इत्यादी वेगवेगळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत होतो, तरीही माझ्या मनावरील ताण न्यून होत नव्हता.
२. आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय करून न्यून न झालेला ताण १० मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप ऐकल्यावर लगेचच न्यून होणे
१४.५.२०२१ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप करण्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूचना आली होती. माझ्याकडे ‘निर्विचार’ या नामजपाचे ध्वनीमुद्रण होते. शेवटी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून मी तो नामजप ऐकायला आरंभ केला. त्यानंतर १० मिनिटांतच माझे विचार न्यून होऊ लागले आणि ३० मिनिटांनी विचार पूर्णपणे जाऊन माझा ताणही गेला. त्यानंतर मी सेवेला गेल्यावर माझ्याकडून सेवाही एकाग्रतेने होऊ लागली; म्हणून मला प.पू. डॉक्टरांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. स्वतःकडून ‘ॐ निर्विचार’, असा नामजप होणे आणि नंतर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘साधक ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ असाही नामजप करू शकतात’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध होणे
‘निर्विचार’, हा नामजप करतांना माझ्याकडून ‘ॐ निर्विचार’, असा नामजप होत होता. हा नामजप करतांना मला चांगले वाटत होते; परंतु ‘ॐ’ लावून हा नामजप करायला सांगितले नसल्याने मी पुन्हा प्रयत्नपूर्वक ‘निर्विचार’, असा नामजप करायचा प्रयत्न करत होतो. १३.६.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘साधक ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ असाही नामजप करू शकतात’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली.
देवाने मला हे आधीच सुचवून ‘माझ्याकडून तशी कृतीही करून घेतली’, यासाठी माझ्याकडून देवाचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
४. कृतज्ञता
प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांना होणारा विचारांचा त्रास न्यून व्हावा’, यासाठी ‘निर्विचार’, हा नामजप सिद्ध केला आहे, म्हणजे प.पू. डॉक्टरांचा तसा संकल्पच झाला आहे. त्यामुळे ‘निर्विचार’ असा नामजप केल्यावर साधकांच्या मनातील विचार शीघ्रतेने न्यून होऊन त्यांना पुष्कळ लाभ होणार आहे’, असे वाटून मला प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– श्री. विनयकुमार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |