TMC Violence Sandeshkhali : संदेशखाली (बंगाल) येथे जे काही चालले आहे ते त्रासदायक आहे ! – कोलकाता उच्च न्यायालय

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हिंदु महिलांचा लैंगिक छळ आणि भूमी बळकावण्याचे प्रकरण

संदेशखाली (बंगाल) येथे आंदोलन करणाऱ्या महिला

कोलकाता (बंगाल) – राज्याच्या संदेशखालीमध्ये जे काही चालले आहे ते त्रासदायक आहे. बंदुकीच्या धाकावर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे माध्यमांमध्ये दाखवण्यात आले. हे दुःखद आहे, असे विधान कोलकाता उच्च न्यायालयाने या घटनेवर व्यक्त केले. तसेच न्यायालयाने या प्रकरणाविषयी बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे. यावर आणि २० फेब्रुवारी या दिवशी सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले. याखेरीज संदेशखालीच्या बसीरहाटमध्ये लागू करण्यात आलेले कलम १४४ हटवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीमध्ये महिलांनी तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान आणि त्याचे समर्थक यांच्यावर लैंगिक छळ अन् भूमी  बळकावल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक महिला आंदोलन करत आहेत. शेख शाहजहान याच्या अटकेची मागणी महिलांनी केली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे दुसरे नेते शिवप्रसाद हाजरा यांच्या शेत आणि शेतघर यांना आग लावली. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने स्वतःहून सुनावणी करतांना वरील आदेश दिला.

या प्रकरणी भाजपने बसीरहाटचे पोलीस अधीक्षक हुसेन मेहेदी यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला; येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटेतच रोखण्यात आले. या वेळी झालेल्या झटापटीच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजूमदार घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसचे गुंड हिंदु महिलांना लक्ष्य करत आहेत ! – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

यापूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी आरोप करतांना म्हटले होते की, तृणमूल काँग्रेसचे सरकार पक्षाच्या गुंडांना संरक्षण देत आहे. संदेशखाली येथील हिंदु महिलांनी सांगितले की, तृणमूलचे गुंड घरोघरी जाऊन ‘कोणत्या घरात सुंदर महिला आहे, तरुण आहे?’, हे पहायचे. त्या विवाहित असल्या, तर ‘आता त्या आमची संपत्ती आहेत’, असे या गुंडांकडून सांगण्यात येत आहे. ममता बॅनर्जी हिंदूंच्या हत्याकांडासाठी ओळखल्या जातात. त्या त्यांच्या पक्षातील पुरुषांना महिलांशी गैरवर्तन करू देत आहे. देशातील जनता हे शांतपणे कसे बघणार?

राज्यपालांनी अहवाल मागवला !

दुसरीकडे  बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी म्हटले होते की, संदेशखालीमधील परिस्थिती भयानक आणि धक्कादायक आहे. बोस जेव्हा संदेशखाली येथे पोचले, तेव्हा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन त्यांच्या विरोधात निदर्शने केली. बोस यांनी संदेशखालीविषयी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.

(म्हणे) ‘कोणताही अनुचित प्रकार घडला नाही !’ – पोलिसांचा दावा

संदेशखाली घटनेविषयी बंगाल पोलिसांचे म्हणणे आहे की, तेथील परिस्थिती शांततापूर्ण आहे. तेथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आम्ही कुणालाही तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करू.

गेल्या मासात शेख शाहजहान याच्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावर केले होते आक्रमण !

५ जानेवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने तृणमूलचा नेता शेख शाहजहान याच्या घरावर धाड टाकण्यास गेले असता तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी या पथकावर आक्रमण केले होते. यात ३ अधिकारी घायाळ झाले होते. तेव्हापासून शाहाजहान पसार आहे. त्याच्यावर राज्यात कोरोनाच्या काळात झालेल्या सहस्रो कोटी रुपयांच्या रेशन घोटाळ्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

उच्च न्यायालयाला असे म्हणावेसे वाटते, यातून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते ! राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंचे आणि देशाचे रक्षण करण्याला पर्याय नाही !