सिंधुदुर्ग : विकलांग तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणातील डॉक्टरवर कारवाईची मागणी
कुडाळ : तालुक्यातील एका गावातील विकलांग (दिव्यांग) तरुणीवर अत्याचार करून कालांतराने तिचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे; मात्र तरुणीचा गर्भपात करणार्या डॉक्टरवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ आंदोलन करतील, अशी चेतावणी शिवसेनेचे (शिंदे गटाचे) जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदनाद्वारे दिली आहे, तसेच संबंधित गावातील महिलांनीही या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पीडित तरुणी संशयित आरोपीचा घरी घरकामास होती. अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली. या प्रकरणानंतर गावातील महिलाही या प्रकरणाने आक्रमक झाल्या असून पुन्हा असे कृत्य होऊ नये, यासाठी अत्याचार करणारा आणि संबंधित डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.