सिंधुदुर्ग : अरुणा धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ९ व्या दिवशीही चालू
१० व्या दिवशी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करणार
वैभववाडी : हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील विहिरीसाठी ५ फेब्रुवारीपासून अरुणा धरणग्रस्तांनी धरणे आंदोलन चालू करून धरणाच्या कालव्याचे काम बंद पाडले आहे. या आंदोलनाला ९ दिवस होऊनही संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे १० व्या दिवशी विहिरीविषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याची चेतावणी धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना दिली आहे.
१. अरुणा धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या १६५ कुटुंबांचे वर्ष २०१९ मध्ये हेत किंजळीचा माळ येथे पुनर्वसन केले आहे. या पुनर्वसन गावठाणासाठी हेत बांबर येथे पाटबंधारे विभागाने बांधलेल्या विहिरीवरून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
२. ही विहीर नेमकी कुणाची आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. कागदोपत्री पुनर्वसन गावठाणासाठी विहीर आहे, अशी नोंद आहे; मात्र पुनर्वसन गावठाणात विहीरच नसल्यामुळे आमचे पाण्याविना हाल होत आहेत.
३. पाटबंधारे विभागाने आम्हाला आमच्यासाठी असलेली विहीर दाखवावी, नाहीतर नवीन विहीर खोदून द्यावी.
४. आंदोलनाच्या नवव्या दिवशीही प्रकल्पस्थळी वयोवृद्धांसह माजी सरपंच सुरेश नागप, शिवाजी पडीलकर, सुनील नागप, विजय नागप, महादेव नागप, धोंडू नागप, सदाशिव नागप, विनोद नागप, परशुराम पडीलकर, मानजी घाग, दत्ताराम कदम, ज्ञानेश्वर नागप, गोपाळ सुतार, हिरालाल गुरव, अंकुश कदम आदी धरणग्रस्त उपस्थित होते.